मानाच्या १० पालख्या आज वाखरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:15 AM2021-07-19T04:15:58+5:302021-07-19T04:15:58+5:30
पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीची पायी वारी खंडित झाली असली तरी वाखरी येथून संतांचा मेळा एकत्रित पंढरीत येण्याची शेकडो ...
पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढीची पायी वारी खंडित झाली असली तरी वाखरी येथून संतांचा मेळा एकत्रित पंढरीत येण्याची शेकडो वर्षांची परंपरा मात्र जोपासली जाणार आहे. पालखी तळावर सर्व ती तयारी झाली आहे. १० पालख्यांसाठी १० स्वतंत्र शामियाने, स्वतंत्र आरोग्य, जेवण, आपत्ती व्यवस्थापन, स्वागत कक्ष उभारले आहेत. पालखी तळाला पूर्ण बॅरिकेडिंगच्या साहाय्याने बंदिस्त करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तामुळे पालखी तळाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सोमवारी दुपारी ४ च्या दरम्यान सर्व मानाच्या पालख्या मोजक्याच वारक-यांसह वाखरीत दाखल होणार आहेत. पालखी मार्गावर पूर्णपणे पोलीस बंदोबस्त असणार असून संचारबंदी असल्याने कोणीही स्थानिक किंवा परवानगी नसलेली व्यक्ती सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाही. दर्शनासाठीही येऊ शकणार नाही. वाखरी ते पंढरपूर या प्रमुख पालखी मार्गावर असणारी उपनगरे, स्थानिक सोसायट्यांचे उपमार्ग बांबू, लोखंडी बॅरिकेडिंगच्या साहाय्याने बंदिस्त करून तेथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. वाखरी पालखी तळावर दहा पालख्यांना थांबण्यासाठी वॉटरप्रूफ दहा स्वतंत्र मंडपांचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक पालखीतील चाळीस वारकऱ्यांना थांबण्याची आणि भोजनाची सोय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून केली जाणार आहे. बॅरिकेडिंग, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, स्वच्छतागृहे, आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय व्यवस्था, वॉटरप्रूफ मंडप आदी व्यवस्था पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यानी दिली आहे.
---
वाखरी ते पंढरपूर पायी प्रवास
२० जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून प्रमुख १० संतांच्या मानाच्या पालख्या सर्वप्रथम वाखरी येथील पालखी तळावर येणार आहेत. या ठिकाणी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत पालख्या येतील. त्यानंतर पारंपरिक कार्यक्रम, संतांच्या भेटी, भजन, कीर्तन होऊन मानाप्रमाणे पालख्या पायी चालत प्रत्येकी ४० वारकऱ्यांसह पंढरीकडे निघतील. इसबावी विसावा इथपर्यंत सर्व पालख्या पायी चालत येतील. तेथून पुढे प्रत्येक पालखीसोबत २ वारकरी असतील आणि उर्वरित वारकरी बसमधून पुढे पंढरीत पोहोचतील, असे नियोजन प्रशासनाने केले आहे.
----
पालख्या पंढरीत आल्यानंतर विसावा मंदिर, चंद्रभागा नदी वाळवंट, तुकाराम भवन, मंदिर परिसर, शासकीय विश्रामगृह, गोपाळपूर, सांस्कृतिक भवन, प्रांत कार्यालय अशा वेगवेगळ्या १४ ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केले आहे.
- सचिन ढोले
प्रांताधिकारी
---
फोटो :
वाखरी पालखी तळाला बॅरिकेडिंग करून दोन प्रमुख गेट केले आहेत. तेथे असा कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे.
फोटो लाईन ::::::::::::::
वाखरी पालखी तळावर प्रमुख दहा पालख्यांची व्यवस्था केलेला नकाशा.
फोटो लाईन :::::::::::::::::::
पालखी तळावर उभारण्यात आलेले स्वतंत्र शामियाने छायाचित्रात दिसत आहेत.