सोलापूर शहरातील मंडळाचे प्रमुख म्हणताहेत, यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 01:25 PM2020-08-19T13:25:09+5:302020-08-19T13:27:34+5:30
‘लोकमत’च्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद : शाडूच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसोबत वृक्षारोपणाचाही संकल्प
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव फक्त पर्यावरणपूरक साजरा करू, असा संकल्प शहरातील बहुतांश गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाºयांनी केला आहे. मंडळाच्या पदाधिकाºयांच्या घरी यंदा शाडूच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. जास्तीत जास्त मंडळांकडून वृक्षारोपणाचाही संकल्प शहरातील मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत.
‘शाडूच्या गणेशमूर्ती घरोघरी’ या समाजाभिमुख उपक्रमाची संकल्पना लोकमतने मांडली. सोलापुरात या संकल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. हजारो सोलापूरकर लोकमत उपक्रमाचे स्वागत करताहेत.
बाप्पांचे विसर्जनही घरातच करा -चव्हाण
मंडळाच्या बैठकीत लोकमतच्या उपक्रमाची पदाधिकाºयांना माहिती दिली. कार्यकर्त्यांनाही त्यांच्या घरी शाडूच्या श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणार आहोत. त्यासाठी विविध उपक्रम घेणार ्रआहोत. आमच्या मंडळासाठी नगरसेवक अमोल शिंदे, संकेत पिसे, करण लोलगे, प्रकाश अवस्ती, सदानंद मोरे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचे थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाचे प्रताप चव्हाण यांनी सांगितले.
आमच्या मंडळाची भव्य मूर्ती पर्यावरणपूरक आहे. आमची मूर्ती प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनवलेली नाही. फायबरची आहे. त्यामुळे वीर गणपती मूर्तीचे विसर्जन आम्ही करत नाही. अनेक वर्षे टिकणारी मूर्ती आहे. सोबत छोटी शाडूची गणेशमूर्तीची आम्ही प्रतिष्ठापना करतो. ११ दिवसांनंतर त्याचे विसर्जन देखील करतो. वीर गणपती मंडळाकडून प्रतिवर्षी पर्यावरणपूरक विविध कार्यक्रम होतात. यंदा आम्ही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणार आहोत. लोकमतच्या आवाहनानुसार आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी शाडूच्या गणेशमूर्ती बसवणार आहोत.
- सतीश सपकाळ
अध्यक्ष -वीर गणपती ट्रस्ट
पूर्व भाग पोशम्मा देवस्थान संचलित दाजी गणपतीची मूर्ती पर्यावरणपूरक आहे. दरवर्षी आम्ही आरोग्य शिबीर, पर्यावरणपूरक वृक्षारोपण इतर समाजाभिमुख कार्यक्रम राबवितो. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. विशेष म्हणजे पूर्व भागातील गणेशभक्तांना शाडूच्या गणेशमूर्तीची माहिती मिळावी, याकरिता जनप्रबोधन करणार आहोत.
- श्रीनिवास जोगी
सचिव, दाजी गणपती, सोलापूर