मंदिर समिती करणार ‘संतवाणी’ रेडिओ वाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:22 AM2021-01-23T04:22:38+5:302021-01-23T04:22:38+5:30
नव्या तंत्रज्ञान युगाचे महत्व आता सर्वांनाच पटले आहे. जगभरातील माहिती घरबसल्या पाहण्याची सोय नव्या तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली आहे. ...
नव्या तंत्रज्ञान युगाचे महत्व आता सर्वांनाच पटले आहे. जगभरातील माहिती घरबसल्या पाहण्याची सोय नव्या तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली आहे. खेड्यातील कौलारू घरात बसून ते थेट परदेशातील आलिशान कार्यालयात बसून आता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे ऑनलाईन दर्शन घेणे यामुळेच सहज शक्य आहे. या तंत्रज्ञानामुळेच काही वर्षांपासून पंढरीची वारीदेखील जगभरात पोहोचलीय. सर्वांचा विचार करून कोल्हापूर येथील धैर्यशील पाटील यांना संतवाणी कम्युनिटी रेडिओ निर्मितीची कल्पना सुचली.
सध्या अनेक रेडिओ वाहिन्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असताना याचे वेगळेपण काय, असा प्रश्न पडू शकतो. मात्र या रेडिओ वाहिनीद्वारे पंढरीसह संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्ती, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत एकनाथ, संत नामदेव आदीं मानाच्या सात पालख्या निघतात, तेथून ही वाहिनी सुरू केली जाणार आहे. याव्दारे धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक, शासकीय माहिती तसेच आपत्ती निवारण आदींविषयी माहिती दिली जाणार आहे.
याबाबत धैर्यशील पाटील यांनी सातही संस्थानच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही माहिती दिली आहे. त्यांनीदेखील यास तत्त्वतः मान्यता दिली असून, नुकत्याच पंढरपूरच्या मंदिर समितीसमोर त्यांनी हा आराखडा मांडला आहे. याबाबतीत मंदिर समिती पुढाकार घेणार असून, यासाठी येणारा खर्च व तांत्रिक परवानगीसाठी शासनाच्या प्रतिनिधींची भेटदेखील घेण्यात येणार आहे. यावर सर्व संत संस्थानचे प्रतिनिधी व पंढरीची मंदिर समिती यांची लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
काय आहे याची उपयोगिता
पंढरीत चार प्रमुख वाऱ्या भरतात तेव्हा भाविकांना दर्शन किंवा इतर सुविधांबाबत माहिती देण्यासाठी याचा मोठा उपयोग होऊ शकतो. एखादी दुर्घटना घडल्यावर अफवा पसरतात. याबाबत शासनाची अधिकृत माहिती देण्यासाठी हे प्रभावी माध्यम ठरणार आहे. या रेेडिओची रेंज २५ कि.मी. पर्यंत राहणार आहे. तसेच मंदिर समिती व सात मानाच्या पालखी संस्थानच्या स्वतंत्र वेबसाईट असून, याला संतवाणी रेडिओची लिंक जोडल्यास जगभरात कोठेही हे रेडिओ चॅनल ऐकणे शक्य आहे.