सुट्ट्या अन् दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदियाळी
By काशिनाथ वाघमारे | Published: December 23, 2023 07:33 PM2023-12-23T19:33:05+5:302023-12-23T19:36:34+5:30
शासकीय व नाताळाच्या सुट्टया, दत्त जयंती याचे औचित्य साधून नूतन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता भाविकांची मांदियाळी जमली आहे.
सोलापूर : सालाबादाप्रमाणे दत्त जयंती उत्सव सोहळा मंगळवार, २६ डिसेंबर रोजी येथील स्वामी समर्थांच्या मंदिरात पार पडत आहे. त्यानिमित्त २३ डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ दरम्यान दरवर्षी दर्शनासाठी गर्दी लोटते. शासकीय व नाताळाच्या सुट्टया, दत्त जयंती याचे औचित्य साधून नूतन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता भाविकांची मांदियाळी जमली आहे.
२६ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त देवस्थानच्या विश्वस्ता उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दत्तजन्म आख्यान वाचन, व भजन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होईल.
दत्त जयंती दिनी भक्त निवास येथील भोजन कक्षात भक्तांना दुपारी महाप्रसाद देण्यात येणार आहे. बुधवार, २७ डिसेंबर रोजी दुपारी नैवेद्य आरती होईल. त्यानंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप होईल. सायंकाळी ५ ते रात्री ९.३० या वेळेत शहरातून श्रींची पालखी मिरवणूक भजन, दिंड्या व वाद्यांसह निघणार आहे. सालाबादप्रमाणे अक्कलकोट शहरातून पालखी सोहळा निघत असल्याची माहिती मंदिर विश्वस्त समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
नित्य अभिषेक थांबवणार, भाविकांसाठी निवासाची सोय
* या काळात स्वामी भक्तांना सुलभतेने दर्शन व्हावे म्हणून नित्यनियमाने होणारा अभिषेक थांबविण्यात येत आहेत.
* भांडूप, मुंबई, तळेहिप्परगा, भातंबरे, कोल्हापूर, सातारा, खर्डी, गांवखडी, पुणे, रत्नागिरी या ठिकाणांहून दिंडी व पालखीसोबत पायी येणा-या सर्व स्वामी भक्तांसाठी भोजन, प्रसादाची व निवासाची सोय मैंदर्गी रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवासात करण्यात आली आहे.