ब्रह्मपुरीत अवैध वाळू साठ्यावर मंगळवेढा पोलिसांची कारवाई; वाळूसह उपस्यासाठी वापरण्यात येणारी यारी, ट्रॅक्टर जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 04:46 PM2023-04-15T16:46:33+5:302023-04-15T16:49:02+5:30
अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांच्या विरोधात पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याने अवैध वाळू वाहतुकीला चाप बसणार आहे.
मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : ब्रह्मपुरी ( ता मंगळवेढा) येथे बठाण रोडवरील भीमा नदीकाठी शेतातून रस्ता करून यारीच्या सहाय्यानं काढण्यात आलेल्या अवैध वाळुसह ट्रॅक्टर, यारीसह लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल १५ एप्रिल शनिवारी सकाळी जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जप्त वाळू मंगळवेढा तहसील कार्यालयात नेण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने व सपोनि बापूसाहेब पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांच्या विरोधात पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याने अवैध वाळू वाहतुकीला चाप बसणार आहे.
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील बोराळे बिटचे तुकाराम कोळी, महेश कोळी, ईश्वर दुधाळ व इतर पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आदी पथक पेट्रोलिंग करत असताना बठाण रोडवर शेतात वाळू काढण्यात आल्याचे दिसून आले. कोणतीही परवानगी नसताना वाळू साठा मिळून आला असे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. मंडळ अधिकारी इंगोले, तलाठी शेख यांनी अवैध वाळू साठ्याचा पंचनामा केला.
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक वाळू साठ्याचा गोरखधंदा ब्रह्मपुरी परिसरात सध्या फोफावत होता. बठाण रोडवरून अवैधरीत्या वाळूची मोठ्या प्रमाणावर राजरोस चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याच्या नागरिकांच्या वाढत्या तक्रारी होत्या. यापूर्वी ठोस कारवाई न झाल्याने वाळू माफियांचे फावत होते. परिणामी शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवून नुकसान होत होते. विनाक्रमांक धावणाऱ्या वाहनांमधून ही चोरटी वाळू वाहतूक सुरू होती. या कारवाईने वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे कामही पोलीस ठाण्यात सुरू आहे.