मंगळवेढा पोलीसांनी अवैध गुटखा वाहतूक करण्या-या पिकअपसह २३ लाखाचा गुटखा जप्त करून तिघांना केले गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2023 05:18 PM2023-02-02T17:18:57+5:302023-02-02T17:20:24+5:30
कर्नाटक राज्यातून मरवडेमार्गे जीपमधून जाणारा १५ लाख ४० हजार रुपये किंमतीचा गुटखा व ८ लाखाची जीप असा एकूण २३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे
कर्नाटक राज्यातून मरवडेमार्गे जीपमधून जाणारा १५ लाख ४० हजार रुपये किंमतीचा गुटखा व ८ लाखाची जीप असा एकूण २३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांच्या पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी संभाजी अमसिध्दराव बन्ने (वय ३९ वर्षे रा. कमलापूर ता. सांगोला), बिन्नी गणपती नाव्ही (वय ३२ वर्षे जालिहाळ बु॥ ता. जत), अमित विभुते (रा. मंगेवाडी ता. सांगोला) पिकअप वाहन मालक तानाजी माळी (रा. एकतपूर रोड सांगोला) , गुटखा पुरवठादार मल्लु चांदकोटी (रा. चडचण ता. चडचण जि. विजापूर) यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस निरीक्षक रणजित माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजे चडचण (कर्नाटक राज्य) येथून एक महिंद्रा बोलेरो पिकअपमधून काही लोक हे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा अवैध्यरित्या घेवून येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, पोहेकॉ महेश कोळी, सुनिल मोरे, मळसिध्द कोळी, अजित मिसाळ, खंडाप्पा हात्ताळे या टीमने मरवडे गावाजवळ नाकाबंदी केली. यावेळी आलेल्या पिकअपच्या हौदयात काय आहे, असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने आम्ही त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर पिकअपच्या हौदयात गुटखा असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर सदर तिन्ही आरोपींना पिकअपसह २३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने व त्याचे पथकातील पोहेकॉ महेश कोळी, सुनिल मोरे, मळसिध्द कोळी, अजित मिसाळ, खंडाप्पा हात्ताळे या पथकाने केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"