माणगंगा नदी स्वच्छता, पुनर्जीवन ६६ कि.मी. टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:16 AM2021-06-18T04:16:01+5:302021-06-18T04:16:01+5:30
सन २०१६ साली माणगंगा भ्रमणसेवा संस्था सांगोला व श्री बृहद भारत समाजसेवा संस्था, मुंबई यांनी माणगंगा स्वच्छतेसह पुनर्जीवनाचे काम ...
सन २०१६ साली माणगंगा भ्रमणसेवा संस्था सांगोला व श्री बृहद भारत समाजसेवा संस्था, मुंबई यांनी माणगंगा स्वच्छतेसह पुनर्जीवनाचे काम सुरू केले आहे. चालू वर्षात आटपाडी तालुक्यातील माण नदीपात्र स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. या कामासाठी आटपाडी तालुक्यातून आ. अनिल बाबर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तानाजी पाटील, तर सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन शेषागिरीराव यांनी सहभाग घेतला. तसेच नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक दत्ता खरात, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक गणेश थोरात, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक राजाभाऊ वाघमारे यांच्या परिश्रमातून २७.५ कि.मी.चे नदीपात्र व सात को.प. बंधारे स्वच्छ झाले. यामुळे आतापर्यंत राजेवाडी ते सावे अखंड ६६ कि.मी. नदीपात्रासह १८ को. प. बंधारे स्वच्छ करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून झाले आहे.
या कामात विट्याचे प्रांताधिकारी संतोष भोर, आटपाडीचे तहसीलदार सचिन मुळीक यांचे मार्गदर्शन लाभले. सन २०२२ सालात सावे ते गुंजेगाव (ता. मंगळवेढा) या १४ कि.मी. माण नदीपात्राची स्वच्छता करून भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये ८० कि.मी. नदीपात्राची स्वच्छता करण्याचे उद्दिष्ट असल्याचे वैजिनाथ घोंगडे यांनी सांगितले.
फोटो ओळ : जेसीबीच्या साहाय्याने माणगंगा नदीपात्राची स्वच्छता केली जात असल्याचे छायाचित्र.