आंबा महोत्सवाचे उदघाटन, राज्यातील आंबा उत्पादक सोलापूरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:45 AM2018-04-24T11:45:19+5:302018-04-24T11:45:19+5:30
मंद्रुप येथे निर्यात सुविधा केंद्राचा प्रस्ताव सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती
सोलापूर: दर्जेदार आंबा खायला मिळावा या संकल्पनेतून आंबा महोत्सवाची कल्पना पुढे आली असून, सोलापुरात डाळिंब निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी मंद्रुप येथील जागेचा प्रस्ताव असल्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळ व सोलापूर बाजार समितीच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सोलापूरला नावारुपाला आणायचे आहे, सोलापूरकरांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सहकार मंत्र्यांनी केले. शेतकºयांच्या मालाला थेट बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यात १३५ आठवडा बाजार केंद्रे सुरू करण्यात आली असून, हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मार्च २०१८ पर्यंत मागणी असलेल्या सर्व शेतकºयांना वीज कनेक्शन देण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचे सहकार मंत्र्यांनी सांगितले. उसाचे क्षेत्र वाढल्याने पुढील वर्षी आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा तसेच कच्ची साखर व थेट इथेनॉल तयार करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. मंद्रुप येथे निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी पाटबंधारे खात्याच्या साडेतीन एकर जमिनीचा प्रस्ताव असून, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी ती जागा मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, असे सहकार मंत्री देशमुख यांनी आवाहन केले.
शेतकºयांचे उत्पादन वाढण्यासाठी जलयुक्त शिवार योजना प्रभावी ठरली असून, जलयुक्त कामांमुळे जिल्ह्यात पाण्याचा साठा वाढल्याने उजनी धरणाचे पाणी शिल्लक असल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले. स्थानिकांच्याही आंब्याला स्थान देण्यात यावे, असे सांगत निर्यात केंद्रासाठी मंद्रुपच्या जागेचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हाधिकाºयांना केली. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी बाजारात अपेक्षेप्रमाणे गुणवत्तेचा आंबा मिळण्याची खात्री नसल्याने आंबा महोत्सवाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य बँकेचे संचालक अविनाश महागावकर, पणनचे दिलीप नाईक, अशोक गार्डी, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे, सचिव मोहन निंबाळकर, मनपा महिला व बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण, नगरसेविका संगीता जाधव, काशिनाथ कदम, गणेश चिवटे, श्रीकांत देशमुख, पं.स. सदस्य हरिदास शिंदे, संभाजी भडकुंबे, वैजिनाथ साबळे, श्रीमंत बंडगर, केदार उंबरजे, प्रभुराज विभुते आदी उपस्थित होते.
मध्यप्रदेशातही आंबा महोत्सव
- देशात अडीच लाख मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन होते, नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा खायला मिळावा यासाठी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जात असून, थेट आंब्याच्या विक्रीतून शेतकºयांना निर्यातीएवढेच पैसे मिळतात, मध्यप्रदेशातील भोपाळ व इंदूरमध्येही आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याचे महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले.