मनोहरमामाला बारामतीच्या पोलिसांनी उंदरगावच्या आश्रमात फिरवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:22 AM2021-09-13T04:22:00+5:302021-09-13T04:22:00+5:30
बारामती पोलिसांनी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील भोंदूबाबा मनोहर भोसले याच्यासह मामाचे सेवक विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे ...
बारामती पोलिसांनी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील भोंदूबाबा मनोहर भोसले याच्यासह मामाचे सेवक विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्याविरुद्ध बारामती ग्रामीण पोलिसात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात शुक्रवारी (दि. १०) भोसलेला अटक केलेली आहे. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले होते. त्याच्यासह विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
मनोहरमामा भोसलेसह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध करमाळा पोलिसातही बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याला पकडण्यासाठी करमाळा पोलीसही त्याच्या मागावर होते. मात्र, साताऱ्यात बारामती पोलिसांच्या हाती तो लागला. रविवारी दुपारी बारा ते साडेबारा वाजता मनोहरमामा भोसले याला उंदरगाव येथील आश्रमात तपासासाठी बारामतीच्या पोलिसांनी आणले. तब्बल दोन तास आश्रम व मंदिर परिसरात पोलिसांनी मनोहरमामाला फिरवले व तपासकामी माहिती घेतली. यावेळी आश्रम परिसरात बारामती पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.
बारामती न्यायालयाने मनोहरमामाला १६ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्यानंतर पुन्हा बारामतीचे पोलीस तपासकामी भोसले याच्याविरुद्ध पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. यातील अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. दरम्यान, जेव्हा मनोहरमामा भोसले यास न्यायालयीन कोठडी मिळेल, त्यानंतरच त्याला करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल.
..........
(फोटो १२मनोहरमामा)