इफेड्रीन प्रकरणातील आरोपी मनोज जैन सोलापूर पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: August 2, 2016 09:01 AM2016-08-02T09:01:43+5:302016-08-02T09:01:43+5:30
देश-विदेशात अनधिकृतपणे इफेड्रीन विक्री प्रकरणी आरोपी मनोज जैन याला सोलापूरच्या ग्रामीण पोलिसांनी सोमवारी दुपारी ठाण्याच्या कारागृहातून ताब्यात घेतले.
Next
अमित सोमवंशी, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २ - देश-विदेशात अनधिकृतपणे इफेड्रीन विक्री प्रकरणी आरोपी मनोज जैन याला सोलापूरच्या ग्रामीण पोलिसांनी सोमवारी दुपारी ठाण्याच्या कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला मंगळवारी सोलापूरच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी ही माहिती दिली. मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास हे पथक जैन याला घेऊन सोलापुरात दाखल झाले. पहाटे मोहोळ येथे त्याला अटक करण्यात आली़
सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. कंपनीतून अनधिकृतपणे २०१२ व १४ या वर्षांत चेन्नई व रायगड येथील दोन कंपन्यांना २१ टन डी. एल. इफेड्रीनची विक्री केली. तसेच कंपनीने काही नियमांचे उल्लंघन केले असल्याचे यापूर्वीच चौकशीदरम्यान उघड झाले आहे.
देश-विदेशात गाजत असलेल्या सोलापुरातील इफेड्रीन साठाप्रकरणी अनेक दिग्गजांची नावे पुढे आली आहेत. येथील चिंचोली एमआयडीसीत कार्यरत असलेल्या एव्हॉन कंपनीत २३ टन इफेड्रीन जप्त करण्यात आल्यानंतर या प्रकरणी सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एव्हॉनच्या कामगारांची चौकशी केली. एव्हॉन कंपनीने रायगड व चेन्नई येथील दोन कंपन्यांना २१ टन डी.एल. इफेड्रीन विकले होते, त्याची किमत ४५ लाख ४६ हजार रुपये आहे. तसेच कंपनीने अनेक नियमांचे उल्लंघनही केले आहे. देश-विदेशात इफेड्रीनची विक्री केली.
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी न्यायालयात आरोपीचा ताबा मिळण्यासाठी ट्रान्स्पोर्ट अर्ज सादर केला होता. सदर न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे येथे जाऊन सोमवारी दुपारी आरोपी मनोज जैन याचा ताबा घेतला़ हे पथक सोलापुरात मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास दाखल झाले . सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आरोपीचा ताबा घेण्यासाठी रविवारीच ठाण्याला गेले होते. त्यात फौजदार चव्हाण यांच्यासह चार पोलीस कर्मचारी होते.
पहाटे अडीचला अटक
इफेड्रीन प्रकरणातील आरोपी मनोज जैन यास मुंबईतून सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास सोलापुरात आणले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी आरोपी जैन यास मंगळवारी पहाटे अडीच वाजता अटक केली. आरोपी जैन याला आणताना सुरक्षेच्या दृष्टीने खासगी वाहनाचा वापर करण्यात आला.
बंदोबस्त कायम
एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीत इफेड्रीन साठा सापडल्याप्रकरणी ही कंपनी ठाणे पोलिसांनी एप्रिल महिन्यात सील केली आहे. या ठिकाणी ठाणे व सोलापूर ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कंपनीच्या बंदोबस्तासाठी एका वरिष्ठ पोलीस अधिका-याची नियुक्ती करण्यात आली आहे.