'मराठा समाजही करेक्ट कार्यक्रम करू शकतो'; शिंदे-फडणवीसांवर मनोज जरांगेंचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 07:15 PM2024-03-04T19:15:05+5:302024-03-04T19:20:02+5:30
मनोज जरांगेंनी आज सोलापूरात जाहीर सभा घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर निशाणा साधला.
गावातील पोस्टर काढून आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. त्यामुळे दारावरच आम्ही आता पोस्टर लावणार आहोत. तसेच निवडणुकीत राजकीय नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मनोज जरांगेंनी आज सोलापूरात जाहीर सभा घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर निशाणा साधला.
राज्यात मराठा बांधवांनी गाव बंदी केली नाही. पोस्टर लावायला आमच्या घरावर, गाडीवर लावण्याचा आम्हाला अधिकार आहे. मराठा समाजावर साखळी उपोषण केले, तरी गुन्हे दाखल होतात. लोकशाहीची ताकद आम्ही वापरत आहोत त्यातूनच आम्ही एकत्र येणार आहोत. येत्या निवडणुकीत राजकीय सुपडा साफ करायला मराठा समाजाला वेळ लागणार नाही, असं मनोज जरांगे यांनी सांगितले.
मराठा समाजाचा करेक्ट कार्यक्रम करतो, म्हटल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दगा फटका करत नाही, मग काय करताय? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी मर्यादा सोडल्यास मराठा समाज ही करेक्ट कार्यक्रम करू शकतो, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी लोकांवर गुन्हे दाखल करायला सांगितले. माझ्यावरही एसआयटी नेमली. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. आता दूध का दूध, पाणी का पाणी झालेच पाहिजे, असंही मनोज जरांगे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी हे षडयंत्र रचले-
अजूनही तुम्ही सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही. राज्य सरकारने जीआर काढला. शब्दही त्यांनी दिला होता. त्यांच्या शब्दावर आंदोलन सुरू आहे. आता दुसरा डाव टाकायला सुरूवात केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी हे षडयंत्र रचले आहे, असा आरोप मनोज जरांगेंनी केला. मराठा समाजच माझा उत्तराधिकारी आहे. मी आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही, असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केले. ज्या दिवशी अंतरवाली सराटीतून सागर बंगल्याकडे निघालो होतो, त्यावेळेस गृहमंत्र्यांना दंगल घडवायची होती. त्या दिवशी चकमक झाली असती, तर राज्य बेचिराख झाले असते, असा दावाही मनोज जरांगेंनी केला.