वांगीत ११७ एकरात होणार मनोज जरांगे-पाटलांची सभा

By दिपक दुपारगुडे | Published: November 13, 2023 06:55 PM2023-11-13T18:55:49+5:302023-11-13T19:00:59+5:30

करमाळामार्गे येणाऱ्या लोकांसाठी शेलगाव येथून वांगी नंबर तीनमार्गे सभा ठिकाणाकडे येता येईल.

Manoj Jarange Patil's rally will be held in 117 acres in Wangi | वांगीत ११७ एकरात होणार मनोज जरांगे-पाटलांची सभा

वांगीत ११७ एकरात होणार मनोज जरांगे-पाटलांची सभा

सोलापूर : करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक एक येथे उजनी धरणाच्या काठावर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून लढा उभारलेले मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. बुधवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या सभेचे नियोजन पूर्ण झाले असून, सभेचे व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे. तब्बल ११७ एकरांमध्ये सभा होणार आहे.

या सभेसाठी येणाऱ्या लोकांना दोन मुख्य मार्ग उपलब्ध असून, टेंभुर्णीकडून येणाऱ्या लोकांना लोकविकास डेअरीपासून थेट वांगी नंबर एक येथे सभास्थळाकडे जाता येणार आहे. तर करमाळामार्गे येणाऱ्या लोकांसाठी शेलगाव येथून वांगी नंबर तीनमार्गे सभा ठिकाणाकडे येता येईल. गावापासून पश्चिम दिशेला दीड किलोमीटर अंतरावर सभेचे ठिकाण असून, या दरम्यान तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गावापासून सभास्थानापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, तो एक दिवसात पूर्ण होणार आहे. पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छता व काटेरी झुडपे काढण्यासाठी स्वयंस्फूर्तीने या परिसरातील दहा जे. सी. बी. मशिन दोन दिवसांपासून कार्यरत आहेत. या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस तोडून याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सभा संध्याकाळी असल्याने सेवेच्या ठिकाणी व रस्त्याने विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी आलेल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सातशे स्वयंसेवक काम करणार
मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेच्या नियोजनासाठी गावातील व या परिसरातील सातशे तरुण स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने काम करणार आहेत. सभा नियोजनासाठी केवळ सकल मराठा समाजाचे कार्यकर्तेच नाहीत तर इतर समाजाचेही कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. १७१ एकर क्षेत्रावर होणाऱ्या या सभेसाठी ५० हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित राहील, असा अंदाज आयोजकांकडून व्यक्त केला जात आहे.

Web Title: Manoj Jarange Patil's rally will be held in 117 acres in Wangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.