सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदाचा मनोज पाटील यांनी घेतला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:16 PM2018-08-02T12:16:05+5:302018-08-02T12:17:41+5:30
सोलापूर: पदोन्नतीने बदलून जात असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पोलीस यंत्रणेला शिस्त लावून अनेक विधायक बदल घडवून आणले आहेत. अवैध धंदे रोखण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात सुरु असलेले पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक कायम राहणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन कार्यालयीन कामकाजाचा पदभार दिला. यानंतर पत्रकारांशी बोलताना नूतन पोलीस अधीक्षक पाटील यांनी प्रभू यांच्या दिशादर्शक कार्याचे दडपण असणार आहे. आपल्या कार्यकाळातही तोच पायंडा चालू राहणार आहे. जिल्ह्याचा अभ्यास करुन निश्चित अशी ठोस पावले उचलली जातील. अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामीण पोलीस दल यापुढे दक्ष राहण्यावर आपला भर असल्याचे सांगितले.
ज्या नव्या पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव त्यांचा नक्कीच पाठपुरावा करण्यात येईल. दहा वर्षांपूर्वी आपण सोलापूरला होतो. इथल्या यंत्रणेची आपणास माहिती आहे. तथापि दहा वर्षात खूप बदल झाला आहे. त्याची माहिती घेऊन जनहिताच्या दृष्टीने आणि शांतता सुव्यवस्थेसाठी जे जे करता येईल, त्यावर आपण भर देऊ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.