जनशक्तीने ट्रॅक्टरची गर्दी जमवून भर पावसात मारला ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:26 AM2021-09-22T04:26:07+5:302021-09-22T04:26:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पंढरपूर : डिझेलचे दर वाढले, ड्रायव्हरचा पगार वाढला, टायरची किंमत वाढली, तरीही वाहतूक कमिशन मात्र ''जैसे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : डिझेलचे दर वाढले, ड्रायव्हरचा पगार वाढला, टायरची किंमत वाढली, तरीही वाहतूक कमिशन मात्र ''जैसे थे'' आहे. याला कंटाळून जनशक्ती संघटनेच्यावतीने मंगळवारी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर असंख्य ट्रॅक्टरची गर्दी करून ठिय्या आंदोलन केले. भर पावसात केलेल्या आंदोलनाने पंढरपूरकरांचे लक्ष वेधून घेतले.
जनशक्ती संघटनेने गावोगावी बैठका घेऊन ट्रॅक्टर आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यामुळे जनशक्ती संघटनेने ट्रॅक्टर वाहनमालकांच्या मागण्यांसाठी शेकडो ट्रॅक्टरसह के. बी. पी. कॉलेज चौकातून आंदोलनाला सुरुवात केली. सरगम चौक - नवे जुने एसटी स्टँड - सावरकर पुतळा - रेल्वे बोगदा ते तहसील कार्यालय असे आंदोलन झाले. आंदोलक पंढरपूर तहसील आवारात पोहचताच ट्रॅक्टरची लांबलचक रांग लागली. या आंदोलनाने पंढरपूरकरांचे लक्ष वेधले. मात्र, प्रशासन कोणतीच भूमिका घेत नाही अथवा प्रतिसाद देत नसल्याने जनशक्तीच्या अतुल खुपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भर पावसात ठिय्या मारला.
----
गावोगावी बैठका घेऊन केली जनजागृती
२०१५-१६ साली डिझेलचा दर ६५ रुपये प्रतिलिटर होता. आज हा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे. ड्रायव्हरचा पगार सहा हजार होता. तो आता १५ हजारच्या पुढे आहे. टायरच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. कारखानदारांनी मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रकचे कमिशन आजही वाढवलेले नाहीत. शिवाय टोळी करार करण्यासाठी जवळपास पाच लाखांचा ॲडव्हान्स कारखानदारांकडून दिला जातो. यात रक्कम मिसळून मुकादम सोबत करार करावा लागतो. अशात ही टोळी नाही आलीच किंवा पळून गेली तर याची सर्वस्वी जबाबदारी ट्रॅक्टर व ट्रक मालकांवर येते. याचा फटका त्यांना बसतो. परिणामत: जनशक्ती संघटनेने गावोगावी बैठका घेऊन ट्रॅक्टर आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज ट्रॅक्टर मोर्चा काढावा लागला.-----
फोटो : २१ पंढरपूर १
२१ पंढरपूर २
तहसील कार्यालय समोर ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर वाहनसह केलेली गर्दी. ( छाया : सचिन कांबळे)