कारखानदारांनी कोविड केअर सेंटरसाठी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:22 AM2021-04-20T04:22:51+5:302021-04-20T04:22:51+5:30
माढा तालुक्यातील ११७ गावांपैकी जवळपास १०० गावांत कोरोना पोहोचलेला आहे. पहिल्या टप्प्यातल्या लाटेपेक्षा याचे प्रमाण जास्त आहे. याची दक्षता ...
माढा तालुक्यातील ११७ गावांपैकी जवळपास १०० गावांत कोरोना पोहोचलेला आहे. पहिल्या टप्प्यातल्या लाटेपेक्षा याचे प्रमाण जास्त आहे. याची दक्षता येथील यंत्रणेकडून घेतली जात आहे. परंतु कुठे कोविड लस कमी, कुठे रेमडेसिविर इंजेक्शन कमी, कुठे ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत. तर काही ठिकाणी व्हेंटिलेटरच उपलब्ध नाहीत अशी अडचण तालुक्यातील अनेक रुग्णांना येऊ लागली आहे. साखर कारखान्यांनी नागरिकांच्या जीव वाचविण्यासाठी उतरले तर येथील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी अपेक्षा कुर्डूवाडी व्यासपीठचे अध्यक्ष व माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास मेहता यांनी बोलताना केली आहे.
---
अन्यत्र जाऊन विनवणी करावी लागतेय
माढा तालुक्यात सध्या कुर्डूवाडी येथे तीन व टेभुर्णी येथे एक प्रतिबंधात्मक हेल्थ सेंटर सुरू आहे. त्यातीलही सर्व बेड हे फुल्ल झालेले आहेत. तर सध्या कुर्डूवाडी येथे दोन, टेंभुर्णी येथे एक, माढा येथे एक कोविड केअर सेंटर सुरू आहे. तेही बाधित रुग्णांनी फुल्ल होत चालली आहेत. त्यामुळे माढा तालुक्यात आता मोठ्या बेडचे कोविड केअर सेंटरमध्ये सध्या होणे गरजेचे आहे. सध्या येथील सर्व प्रकारचे बेड फुल्ल असल्याने रुग्णांना सोलापूर, बार्शी, अकलूज, पुणे यासारख्या ठिकाणी जाऊन तेथील डॉक्टरांना विनवणी कराव्या लागत आहेत.
........................