तब्बल १२ हजार जणांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:20 AM2021-05-01T04:20:54+5:302021-05-01T04:20:54+5:30
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात मागील वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. पहिली लाट थोपविण्यात प्रशासनाला बऱ्यापैकी यश आले होते. मात्र, ...
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात मागील वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. पहिली लाट थोपविण्यात प्रशासनाला बऱ्यापैकी यश आले होते. मात्र, मागील महिन्याभरापासून दुसऱ्या लाटेने प्रशासनाची डोकेदुखी वाढवली. त्यातच पोटनिवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर बाधित रूग्ण सापडण्याचे प्रमाण सर्वाधिक असले, तरी गेल्या वर्षभरात तब्बल १२ हजार जणांनी कोरोनाला हरविण्याची किमया केल्याचे दिलासादायक चित्र आहे. सध्या रूग्णवाढीचे प्रमाण असले तरी बरे होण्याचे प्रमाण त्याच तुलनेत असल्याने कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासनासह पंढरपूरकर पुन्हा एकवटले आहेत. गतवर्षीच्या पहिल्या लाटेत सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हॉटस्पॉट होते. जिल्ह्यातील इतर तालुक्यात रूग्ण कमी होते. मात्र, पंढरपुरात त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असायचे. यावर्षीच्या लाटेत पोटनिवडणुकीची आणखी भर पडली. त्यामुळे रूग्ण वाढण्याचे प्रमाण कमालीचे वाढले होते. दररोज किमान ४०० ते ५०० रूग्ण सापडत असल्यामुळे महसूल, आरोग्य, पोलीस प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढत होती. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने लावलेला लॉकडाऊन, स्थानिक प्रशासनाने योग्य नियोजन करत लावलेले कडक निर्बंध, दररोज होत असलेल्या दोन हजारांपेक्षा जास्त चाचण्या यामुळे रूग्ण शोधून काढण्यात प्रशासनाला यश मिळत आहे.
हॉस्पिटलमध्ये रूग्णांना जागा मिळत नसल्याने भीती वाढत असतानाच गेल्या वर्षभरात तब्बल १२ हजार जणांनी कोरोनाला हरविण्याचा पराक्रम केला आहे. यामध्ये ८० ते १०० वयोगटातील काही वृद्ध नागरिकांचाही समावेश आहे. सध्या प्रशासन संसर्ग टाळण्यासाठी विविध नियम, अटी घालून देत आहे. त्या पाळल्यास मागील वर्षीप्रमाणे कोरोनाचे उच्चाटन नक्की होऊ शकते. त्यासाठी नागरिकांना प्रशासनासोबत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक ठिकाणी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना रूग्णालयात बेड मिळत नसल्याचे विदारक चित्र आहे. त्यामध्येच कोरोनाची तिसरी लाटही येऊ शकते, असा अंदाज राज्यासह केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. हा प्रकार थांबवायचा असल्यास जास्तीत जास्त लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. १ मेनंतर ही मोहीम सुरू होणार आहे. मात्र, लसीची उपलब्धता पाहता, पहिल्या काही दिवसात प्रत्येकाला लस मिळेल, असे सांगता येत नसले तरी प्रत्येकाने ऑनलाईन नोंदणी करून टप्प्याटप्प्याने लस घेण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
३०० जणांनी गमावले प्राण
पंढरपूर तालुक्यात मागील एक वर्षापासून जवळपास १५ हजारांवर कोरोनाबाधित रूग्ण सापडले हाेते. त्यामध्ये १२ हजारांपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत तर जवळपास ३०० जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर उर्वरित रूग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असल्याचे चित्र आहे.
कोट ::::::::::::::::::::::::
सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी मे मध्ये ती कमी होईल, अशी शक्यता आहे. तरीही नागरिकांनी प्रशासनाने दिलेले नियम काटेकोरपणे पाळल्यास कोरोनाचा संसर्ग थांबविणे लवकर शक्य होईल. प्रशासन आवश्यक ते औषधोपचार करून रूग्ण बरे करण्यासाठी धडपडत असले, तरी स्वत: काळजी घेणे, संपर्क टाळणे, विलगीकरणात राहणे हाच सर्वात मोठा उपाय आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
- सचिन ढोले
उपजिल्हाधिकारी