पंचायत समितीच्या शिक्षण विभागात २६ पैकी तब्बल २२ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:02+5:302021-06-25T04:17:02+5:30
करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत एकूण २२७ प्राथमिक शाळा असून, ७७४ शिक्षक कार्यरत आहेत. या कार्यालयासाठी लिपिकाचे तीन पदे ...
करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत एकूण २२७ प्राथमिक शाळा असून, ७७४ शिक्षक कार्यरत आहेत. या कार्यालयासाठी लिपिकाचे तीन पदे व विस्तार अधिकाऱ्यांची ४ पदे मंजूर असताना एकच लिपिक व एकच विस्तार अधिकारी कार्यरत आहे तर केंद्र प्रमुखाची सर्व १७ पदे जूनपासून रिक्त आहे. केंद्र प्रमुखांचा कारभार प्रभारीवर सुरू आहे. शिक्षण विभागात सर्व शिक्षकांची मुळ पुस्तके भरून स्कॅन करणे,सेवा निवृत्त शिक्षकांचे पेन्शन प्रस्ताव, गट विमा, अंतिम भविष्यनिर्वाह निधीचे प्रस्ताव या कार्यालयामार्फत करावे लागतात पण एकमेव लिपिक असल्याने सन २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे निवृत्ती वेतन सुधारित करणे व निवड श्रेणीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
याचा फटका सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सहन करावा लागत आहे. तालुक्यात शिक्षण विभागात एकच विस्तार अधिकारी कार्यरत असून, ते देखील पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत . तालुक्यात सर्वच शाळांना शालेय पोषण आहार देण्याची जबाबदारी असणारे शालेय पोषण आहाराचे पद सुद्धा रिक्तच आहे. तर सर्व १७ केंद्र प्रमुखांची पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे सुरू आहे.
----
गटशिक्षणाधिकारी सुद्धा प्रभारीच..
करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पद दीड वर्षांपासून रिक्त आहे. पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांच्याकडे तात्पुरता कार्यभार देण्यात आला आहे. गटविकास अधिकारी श्रीकांत खरात महिन्याभरापासून रजेवर असल्याने त्यांच्याकडेच राजाराम भोंग यांना तीन पदाचा कार्यभार सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
----
पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यालयातील कर्मचारी स्टाफ उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना वारंवार या कार्यालयामार्फत पत्रव्यवहार करून निदर्शनास आणले आहे.
- राजाराम भोंग, प्रभारी गटशिक्षणाधिकारी करमाळा.
----
पंचायत समितीच्या शिक्षण विभागात एकच कार्यालयीन लिपिक आहे. त्यामुळे कामकाजावर परिणाम होत आहे. सोमवारपर्यंत दुसरा लिपिक देण्याची व्यवस्था करत आहे.
- गहिनीनाथ ननवरे, सभापती पंचायत समिती करमाळा.
फोटो : पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाची इमारत.