काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात घुसण्याचा अनेकांचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 12:37 PM2019-05-02T12:37:34+5:302019-05-02T12:43:57+5:30

सोलापूर शहर मध्य;  बहुजन वंचित आघाडीबरोबर माकप गेल्याने चित्र बदलणार, युतीवर सेनेचे भवितव्य

Many attempts to infiltrate the citadel of Congress | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात घुसण्याचा अनेकांचा प्रयत्न 

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात घुसण्याचा अनेकांचा प्रयत्न 

Next
ठळक मुद्देसोलापूर लोकसभेसाठी जशी अटीतटीची तिरंगी लढत या मतदारसंघात झाली हीच स्थिती विधानसभेला दिसेलनिवडणूक लोकसभेची असली तरी प्रचारात पाणीपुरवठा, बेकारी, कारखानदारांचे प्रश्न यावरच लक्ष केंद्रित माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पूर्वभागातील ज्येष्ठ नेत्यांना एकत्रित ठेवण्यावर लक्ष केंद्रित

राजकुमार सारोळे 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणाचा फायदा घेत सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम, भाजपचे माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी यांनी साखरपेरणी केली आहे. 

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे सलग दोन वेळा निवडून आल्या आहेत. गेल्या वेळेस या मतदारसंघावर महेश कोठे यांनी हक्क सांगितला, पण त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते काँग्रेसमधून बाहेर पडले. एमआयएमचे तौफिक शेख व भाजपच्या मोहिनी पतकी यांच्याबरोबर शिंदे यांची लढत झाली. यावेळेस या मतदारसंघात पुन्हा इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये इच्छुकांनी आपली  फळी मजबूत करण्याचा प्रयत्न  केला आहे. 

आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या मतदारसंघावर पकड मजबूत ठेवली आहे. सतत मतदारसंघातील लोकांच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांनी भर दिला आहे. लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी आपला मतदारसंघ पिंजून काढला.  सर्वात जास्त सभा त्यांनी आपल्या मतदारसंघात घेतल्या. या मतदारसंघात विडी, यंत्रमाग व कारखान्यातील कामगारांची संख्या जास्त आहे.

त्याचबरोबर घरेलू, बांधकाम कामगारांची मोठी वस्ती आहे. या कामगारांचे प्रश्न घेऊन लोकसभेच्या प्रचाराचा धुराळा उडविण्यात आला. 
विभानसभेचे गणित ओळखून माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी अल्पसंख्याक लोकांसाठी मोठी घरकुल योजना मंजूर करून काम सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने साथ न मागितल्याने त्यांनी बहुजन वंचित आघाडीबरोबर काम करणे पसंत केले. बहुजन वंचित आघाडीत एमआयएम आहे. गेल्या वेळेस एमआयएमच्या उमेदवाराने चांगली ताकद उभी केली होती. विधानसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीची ताकद मिळाली तर मोठा फायदा होईल म्हणून त्यांनी प्रचाराला जोर दिला. 

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे यांचे सर्वात जास्त नगरसेवक आहेत. या नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांनी जुने व नवीन विडी घरकुल, निलमनगर भागात मोठी ताकद उभी केली. विधानसभेचे गणित घालून त्यांनी शिवसेनेत जाण्याच्या निर्णय घेतला. पण विधानसभेच्या वेळेस युती होईल की नाही, याबाबत अनिश्चिततेचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे. 

कोणाची ताकद वाढणार?
- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला मतदारसंघ पिंजून काढला तर पुढील गणिते मांडून आडममास्तर, महेश कोठे यांनी या भागात लक्ष केंद्रित केले. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना एकत्र केले. भाजपतर्फे पांडुरंग दिड्डी यांनी या मतदारसंघाच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्याचबरोबर नगरसेवक नागेश वल्याळ, मोहिनी पतकी यांनीही तयारी केली आहे. बहुजन वंचित आघाडीनेही या मतदारसंघात आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. 

लोकसभेसारखीच स्थिती राहणार
- सोलापूर लोकसभेसाठी जशी अटीतटीची तिरंगी लढत या मतदारसंघात झाली हीच स्थिती विधानसभेला दिसेल असे इच्छुकांच्या डावपेचावरून दिसत आहे. निवडणूक लोकसभेची असली तरी प्रचारात पाणीपुरवठा, बेकारी, कारखानदारांचे प्रश्न यावरच लक्ष केंद्रित करण्यात आले.  माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पूर्वभागातील ज्येष्ठ नेत्यांना एकत्रित ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले.

Web Title: Many attempts to infiltrate the citadel of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.