ऐन पावसाळ्यात सोलापूर शहरातील अनेक डीपी बॉक्स सताड उघडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 02:53 PM2020-06-29T14:53:45+5:302020-06-29T14:56:40+5:30
महावितरणचे दुर्लक्ष; शॉर्टसर्किटचा धोका वाढला अनेक ठिकाणी स्पार्किंगने लागतेय आग
दीपक दुपारगुडे
सोलापूर : सध्या वादळी वारे आणि पावसाचा मोसम असताना शहरातील अनेक डीपी बॉक्स सताड उघडे असल्याचे निदर्शनास आले. यामुळे शॉर्टसर्किटचा धोका वाढला असून, तेथे स्पार्किंग होत असल्याचेही दिसून आले आहे.
पावसाळ्यामध्ये या डीपीतून शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही या महत्त्वाच्या बाबींकडे महावितरण आणि पालिकेने दुर्लक्ष केले आहे. डीपींची दुरुस्ती आणि विजेशी संबंधित नादुरुस्त उपकरणांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वीच होणे गरजेचे असताना डीपी बॉक्सची दारं आणि त्याच्या कड्या दुरूस्त करण्यात आल्या नाहीत, हेही पाहण्यात आले.
एमआयडीसी परिसरातील रोहित्रांचे दरवाजे तुटलेले आणि उघडे आढळले. या रोहित्रांमध्ये मोठा विद्युत प्रवाह असल्याने एखादी व्यक्ती या प्रवाहाच्या संपर्कात असल्यास त्या व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता आहे.
तसेच या रोहित्रामध्ये पाणी गेल्यास शॉर्टसर्किट होण्याची देखील शक्यता आहे. डीपी बॉक्सचे दरवाजे उघडे असल्यामुळे बॉक्समधील तारा दिसत आहेत.
होटगी रस्त्यावरील मजरेवाडीकडे जाणाºया रस्त्यावरही असाच उघडा डीपी बॉक्स दिसून आला. येथे रस्त्यावरील भागात पाणी साचून वीजप्रवाह या पाण्यात उतरण्याची शक्यता आहे.
या रस्त्यांवरून कायमच नागरिकांची वर्दळ असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. तर काही वेळेस जास्त दाबाने वीजप्रवाह असल्यास डीपीजवळच्या वीजवाहक तारांत स्पार्किंग होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या मार्गावरील चेतन फौंड्रीजवळ डीपी बॉक्सही उघडाच आहे. हा शहरातील व्हीआपी मार्ग असताना या उघड्या डीपीकडे मात्र वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष आहे. याकडे कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
घराच्या शेजारीच उघडे डीपी बॉक्स
होटगी रोड औद्योगिक वसाहतीमध्ये एका घराजवळ उघडा डीपी बॉक्स आहे. त्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. पावसाळ्याच्या काळात वाºयाच्या हेलकाव्याने प्रवेशद्वारात विजेचा प्रवाह उतरू शकतो. येथे शॉर्टसर्किट होऊन एका कारखान्याला आग लागल्याची घटना घडली होती. तरीही हा डीपी उघडा आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील बºयाच डीपी या उघड्या आहेत, त्यांचे बॉक्स हे खराब झाले आहेतक़ाहींना दरवाजे नाहीत़ या समस्येवर विभागीय कार्यालयाने ५० लाखांच्या पुढे टेंडर काढले आहे़ ते मंजूरही झाले आणि लॉकडाऊनमुळे काम रखडले़ लवकरात लवकर डीपी बसवले जातील.
- प्रसन्न कुलकर्णी
शहर अभियंता, महापारेषण