गारपीटग्रस्तांची अनुदानासाठी तहसीलमध्ये गर्दी अनेक जण वंचित; पोलीस बंदोबस्तात घेतले अर्ज
By admin | Published: May 5, 2014 10:19 PM2014-05-05T22:19:02+5:302014-05-07T00:29:39+5:30
बार्शी :- मागील दोन महिन्यांपासून बार्शी तालुक्यातील शेतकर्यांच्या पाठीशी लागलेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याने अनुदानापासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकर्यांनी अर्ज जमा करण्यासाठी आज तहसील कार्यालयात मोठी गर्दी केल्याने पोलीस बंदोबस्तात हे अर्ज घेण्यात आले़
बार्शी :- मागील दोन महिन्यांपासून बार्शी तालुक्यातील शेतकर्यांच्या पाठीशी लागलेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याने अनुदानापासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकर्यांनी अर्ज जमा करण्यासाठी आज तहसील कार्यालयात मोठी गर्दी केल्याने पोलीस बंदोबस्तात हे अर्ज घेण्यात आले़
कापूस, कांदा, ज्वारी, गहू, हरभरा, मका आदी पिकांची काढणी ही जानेवारी ते मार्च या कालावधीत केली जाते व यंदा नेमक्या याच सुगीच्या दिवसात तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात गारपीट, अवकाळी व वादळी वार्याने तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले़ ही गारपीट गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने होत आहे़ या गारपिटीमुळे रब्बीच्या पिकांबरोबरच द्राक्ष व इतर फळपिकांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे़
नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश असताना तसेच प्रत्येक पंचनाम्यावर संबंधित शेतकर्यांची स्वाक्षरी घेणे, याद्यांचे चावडी वाचन करणे, गरज वाटल्यास नुकसानीचा फोटो घेणे, या पंचनाम्यावर गावातील तंटामुक्त समिती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांच्या देखील सक्षी घेणे बंधनकारक असताना अनेक गावात पंचनामे करणार्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकाने मात्र सुरुवातीला शेतावर जाऊन नंतर ऑफिसमध्ये किंवा गावात बसूनच पंचनामे केले़ त्यामुळे हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले आहेत़ यामध्ये अनेकांचे क्षेत्र कमी लागले आहे, तर कित्येकांचे शेतात असलेले पीक वेगळे अन् पंचनाम्यावर दुसरेच लावले गेले आहे, तर कित्येक शेतकर्यांची पिके बागायती असताना जिरायत म्हणून पंचनामे करण्यात आले आहेत़
पंचनामे पूर्ण झाल्यानंतर देखील या याद्या शेतकर्यांना न दाखविल्यामुळे आपले नाव यादीत आहे का, असल्यास कोणत्या पिकाचे किती क्षेत्रावरील नुकसान झाले आहे, हे शेतकर्यांना समजू शकले नाही, जेव्हा पैसे खात्यावर आले तेव्हाच यात गडबड झाल्याचे शेतकर्यांच्या लक्षात आल्याने गोंधळ व ओरड सुरु झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी राहिलेल्या शेतकर्यांचे फॉर्म घेऊन त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरुप आले आहे़ आज दिवसभर तर पोलीस संरक्षणात बार्शीत हे अर्ज घेण्यात आले़