मराठा क्रांती मोर्चाने बंद केले सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार
By राकेश कदम | Published: October 31, 2023 11:09 AM2023-10-31T11:09:52+5:302023-10-31T11:16:13+5:30
आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखासह पदाधिकाऱ्यांचा समावेश.
राकेश कदम, सोलापूर: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले. या आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्यासह भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.
मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते मंगळवारी सकाळी दहा वाजता सात रस्ता चौकात जमले. त्यानंतर हे सर्वजण विजापूर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आले. 'करेंगे या मरेंगे, हम सब जरांगे' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले. शासकीय अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे कार्यालयात प्रवेश करू नये अन्यथा आज घुसण्यात येईल असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बंदोबस्त लावला होता.