आरक्षणासाठी मराठा समाजाचे उग्र आंदोलन, पंढरपूरात एसटी बसवर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 08:48 PM2018-07-18T20:48:24+5:302018-07-18T20:48:31+5:30
ठोस निर्णय होत नाही. यामुळे मराठा समाजातून संताप व्यक्त होत आहे.
पंढरपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाने उग्र पवित्रा घेतला असून पंढरपुरमधील सांगोला रस्त्यावर बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एस.टी. बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत तीन प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.
सरकारकडून मराठा समाजाला वारंवार आरक्षण देण्याचे अश्वासन देण्यात येत आहे. यावर ठोस निर्णय होत नाही. यामुळे मराठा समाजातून संताप व्यक्त होत आहे. फक्त आश्वासन देण्यात येत असल्यामुळे पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाच्या महापुजेला येऊ देणार नाही, असा पवित्रा मराठा समाजाने घेतला होता.
त्यातच बुधवारी रात्री पंढरपूर-तपकीरी शेटफळ एम.एच. इ. एफ. ६५१० या एसटी बसवर काही मराठा समाजातील तरुणांनी दगड फेक केली. या दगडफेकीत तानाजी मासाळ (रा. शेटफळ), सत्यवान चव्हाण (रा. खर्डी), सोमनाथ आरे (तपकरी शेटफळ) हे प्रवासी किरकोळ दुखापत झाली आहे.
तसेच, कोण म्हणतय देत न्याय, घेतल्याशिवाय राहत नाय, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा मजूकाराचे पत्रक सकल मराठा समाजाच्यावतीने एस.टी. बस समोर टाकण्यात आले आहेत. या घटनेची माहीती पोलीसांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.