मराठा आरक्षण पुन्हा पेटले; ‘एक मराठा...लाख मराठा’चा आवाज पुन्हा घुमला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:26 PM2020-09-12T12:26:52+5:302020-09-12T12:30:23+5:30
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन; टायर पेटवून व्यक्त केला संताप
सोलापूर : शांततेच्या मार्गाने राज्यभर मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्यात आले. अनेकांना यात हौतात्म्य पत्करावे लागले. त्यातून आरक्षणाला ग्रीन सिग्नल मिळाला. मराठा बांधव सुखावला. मात्र नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिल्याने सबंध जिल्ह्यात याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. अनेकांनी तत्कालीन सरकारवर टीकास्त्र सोडले तर काहींनी विद्यमान सरकारने या ज्वलंत विषयाबद्दल गांभीर्य दाखविले नसल्याच्या भावना सर्वच स्तरातून व्यक्त होऊ लागल्या आहेत. केवळ राज्य सरकारचीच नव्हे तर केंद्र व राज्य सरकारांनी मिळून हे आरक्षण टिकविण्याची जबाबदारी असल्याचा सूरही अनेकांनी व्यक्त केला. काही झालेतरी आरक्षण मिळाले पाहिजे. शासनाकडून लवकरच अध्यादेश काढायला हवा, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली. याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ‘एक मराठा-लाख मराठा’चा आवाज देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अवंतीनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी बाळे येथील पुलावर टायर जाळून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. काही कार्यकर्ते या चौकात जमले तर राम जाधव, किरण पवार, अजिंक्य पाटील, निखिल थोरात, राहुल दहीहंडे, सौदागर क्षीरसागर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सकाळी साडेदहाच्या सुमाराला अवंतीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ पोहोचले. या ठिकाणी आधीपासूनच पोलीस थांबले होते. कार्यकर्त्यांनी टाकीवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.
जय जिजाऊ-जय शिवराय, एक मराठा, लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणले. दुपारी सर्व कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
जामिनावर सुटलेल्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमाराला बाळे येथील उड्डाणपूल गाठला. रस्त्यावर टायर जाळून घोषणाबाजी सुरू केली. रस्त्यावर वाहने थांबली. वाहनांची रांग जुन्या बोरामणी नाक्यापर्यंत होती. पोलिसांनी पुन्हा कार्यकर्त्यांची धरपकड केली. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलने करुन आपला संताप व्यक्त केला.