मराठा आरक्षणप्रश्नी आज सोलापूर बंद; आमदार, खासदारांच्या घरासमोर आसूड आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 08:55 AM2020-09-21T08:55:46+5:302020-09-21T08:56:24+5:30
सोलापुरात आंदोलनास सुरुवात; माढ्यात टायर जाळून सरकारचा केला निषेध
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज सोमवारी सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी सोलापूर बंदची हाक दिली आहे. या बंदला सकाळपासूनच सुरुवात झाली माढ्यात आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. शहरात सोलापूर शहर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
सोलापूर जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेऊन मराठा समाज बांधव सरकारचा निषेध करणार आहे. याशिवाय सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांच्या घरासमोर आसुड आंदोलन करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याशिवाय शासकीय मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून सोलापूर जिल्ह्यातील एस - टी बस सेवा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशाने बंद ठेवण्यात आली आहे.
आंदोलनाच्या दिवशी भल्या पहाटे माढा शहरात आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला याशिवाय सोलापूर शहरातील नवी नवीपेठेत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.