सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले, रस्त्यावर टायर जाळून निषेध
By राकेश कदम | Published: September 6, 2023 04:04 PM2023-09-06T16:04:22+5:302023-09-06T16:04:54+5:30
पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाळे गावाजवळ रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध नोंदविला.
राकेश कदम, सोलापूर: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाने सोलापुरात पेट घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाळे गावाजवळ रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध नोंदविला.
राज्य सरकारने आरक्षणाच्या आणि मराठा समाजाच्या ओबीसी दाखला यांचा त्वरित अध्यादेश काढावा अशी मागणी सोलापुरातील कार्यकर्त्यांनी केली आहे. राज्य सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आम्ही सरकारच्या निषेधार्थ उग्र आंदोलनाचे हत्यार उपसल्याचे मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक राम जाधव आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम राहील असा इशाराही जाधव आणि कार्यकर्त्यांनी दिला.