मराठा आरक्षण आंदोलन, कोंडीजवळ सोलापूर- पुणे महामार्ग अडविला
By दिपक दुपारगुडे | Published: February 24, 2024 07:14 PM2024-02-24T19:14:04+5:302024-02-24T19:14:18+5:30
कोंडी गावातून घोषणा देत एकञित आलेल्या तरुणांनी सोलापूर- पुणे रस्त्याच्या दोन्हीही लेन वर ठिय्या मारला.
सोलापूर: ''लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे'' अभी नही तो कभी नही, अशा घोषणा देत समस्त मराठा समाजाच्या वतीने कोंडी येथे सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखुन धरला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार उत्तर तालुक्यातील कोंडी व परिसरातील मराठा समाजासह इतर समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कोंडी गावातून घोषणा देत एकञित आलेल्या तरुणांनी सोलापूर- पुणे रस्त्याच्या दोन्हीही लेन वर ठिय्या मारला. सरकारने कर्मचारी नेमुण सर्वेक्षण केले. त्यात आरक्षण देणे गरजेचे आहे हे अहवालात स्पष्ट झाल्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. माञ देताना न्यायालयात टीकणारे आरक्षण दिले नसल्याचा आरोप आंदोलकींनी केला. ५० टक्क्यांतुन व ओबीसीमधुन आरक्षण मिळेपर्यंत व मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार आंदोलन सुरूच राहील असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाने दिलेले १० टक्के आरक्षण फसवे असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला. शासनाने समाजाची फसवणूक केली असून शांततेत आंदोलन सुरूच राहील असे आंदोलकांनी सांगितले. तहसीलदार उज्वला सोरटे यांनी निवेदन घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.