'आमची मराठी भाषा खूप जुनी अन् सुंदर आहे'; शाळेतील विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
By Appasaheb.patil | Published: February 28, 2023 07:16 PM2023-02-28T19:16:49+5:302023-02-28T19:16:58+5:30
ही पत्रे प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्यात आली आहेत.
सोलापूर: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्रातून होत आहे. केंद्र सरकारकडे तसा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. सुमारे अडीच हजार वर्षांचा समृद्ध वारसा मराठी भाषेला असूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने सोलापूर शहरातील मनपा पांढरे वस्ती शाळेतील ४० विद्यार्थ्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साकडे घातले आहे. ही पत्रे प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्यात आली आहेत.
"आतापर्यंत कन्नड, तेलुगू, तामिळ संस्कृत, मल्याळम व ओडिशा या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, पण अजूनही मराठी भाषेला तो दर्जा मिळाला नाही. तो केंद्र सरकारकडे प्रस्तावित आहे. यासाठी ही पत्रे पोस्टाद्वारे पाठविणार आहोत," अशी माहिती महापालिका मराठी मुली क्रमांक पाचचे मुख्याध्यापक अमोल भोसले यांनी दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल भोसले, किरण शेळगे, श्रीदेवी गौडगावी व आफरीन शेख यांनी परिश्रम घेतले.