६९२ कोटी पाणीपुरवठा योजना लावणार मार्गी, महापौर शोभा बनशेट्टी यांची माहिती, मंत्र्यांसाठी बेरिया यांनी हार तयार ठेवावेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 03:15 PM2018-01-17T15:15:37+5:302018-01-17T15:21:16+5:30
समांतर जलवाहिनी टाकण्याच्या ६९२ कोटींच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला असून, जानेवारीच्या सभेत टेंडरला मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे या योजनेला आव्हान देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. यु. एन. बेरिया यांनी दोन्ही मंत्र्यांचा सत्कार करण्यासाठी हार तयार ठेवावेत, असे खुले आव्हान महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १७ : समांतर जलवाहिनी टाकण्याच्या ६९२ कोटींच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला असून, जानेवारीच्या सभेत टेंडरला मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे या योजनेला आव्हान देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. यु. एन. बेरिया यांनी दोन्ही मंत्र्यांचा सत्कार करण्यासाठी हार तयार ठेवावेत, असे खुले आव्हान महापौर शोभा बनशेट्टी यांनी मंगळवारी दिले.
मनपा प्रशासनाने उजनीवरून समांतर जलवाहिनी टाकण्याची १२४० कोटींची योजना तयार केली होती. कारकिर्दीत पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याची घोषणा महापौर बनशेट्टी यांनी पदभार घेतल्यानंतर केली होती. त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू केल्याचे सांगितल्यावर अॅड. बेरिया यांनी महापौरांनी योजनेची वीट रोवल्यास पालकमंत्री व सहकार मंत्र्यांचा जाहीर सत्कार करू, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा महापौर बनशेट्टी यांनी समाचार घेताना बेरिया यांनी हार तयार ठेवावेत, असे आव्हान दिले आहे.
महापौर बनशेट्टी यांनी पाठपुरावा केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या मोठ्या योजनेला एकाचवेळी निधी शक्य नसल्याने दोन टप्पे करण्याची सूचना केली होती. त्यानुसार प्रशासनाने अभ्यास करून जलवाहिनी, पंपिंग हाऊस व जलशुद्धीकरण केंद्राची ६९२ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. जानेवारीच्या सभेसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. सभेत हा प्रस्ताव मंजूर होऊन टेंडरिंगसाठी एमजेपीकडे तातडीने पाठविला जाणार आहे. त्यामुळे लवकरच या योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते भूमिपूजन करण्याचे प्रस्तावित असून, समांतर जलवाहिनीची योजना मार्गी लावण्याची तयारी पूर्ण केली आहे. तीन वर्षात ही योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न असून, यामुळे सोलापूरचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.