मारकुटा हल्या विक्री करून मरीआई मंदिर परिसर सुधारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:16 AM2021-06-20T04:16:28+5:302021-06-20T04:16:28+5:30
करमाळा : मरीआईला सोडलेल्या मारकुटा हल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करवून सोडले आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामस्थ भयभीत होऊन ...
करमाळा : मरीआईला सोडलेल्या मारकुटा हल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करवून सोडले आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामस्थ भयभीत होऊन जगत आहेत. त्याचा बंदोबस्त करण्याच्या हेतूने सरपंच धनंजय झिंजाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या बैठकीत या हल्याची विक्री करून येणाऱ्या रक्कमेतून मरीआई मंदिर परिसर दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोथरे (ता. करमाळा) येथील मरीआईला एका भक्ताने छोटे रेडकू सोडले होते. हळूहळू या रेडकाचे हल्यात रूपांतर झाले. त्यानंतर हल्या ग्रामस्थांना त्रास देऊ लागला. तो मोकाट असून दिवसभर फिरत असतो. शेतकऱ्यांच्या पिकाचे तर नुकसान करतोच पण त्याला कोणी हाकलण्याचा प्रयत्न केला तर तो अंगावर धावून जातो. आतापर्यंत या हल्याने दोन महिलांना मारल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. त्याची गावात दहशत पसरली आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर १९ जून रोजी शनिमंदिर आवारात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्याच्या विक्रीचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला सरपंच धनंजय झिंजाडे, पोलीस पाटील संदीप शिंदे-पाटील, ग्रामसेवक दरवड, माजी सरपंच बबनराव नंदर्गे, ॲड. नानासाहेब शिंदे, बबनराव जाधव, बारीकराव जाधव, शामभाऊ झिंजाडे, शहाजीराव झिंजाडे, अशोक ढवळे व अन्य ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
---
ग्रामस्थांनी यापुढे मरीआईला हल्या अथवा अन्य प्राणी सोडू नये अशी सूचना करीत आहोत. जर देवीला काही नवसाची वस्तू द्यायची त्याऐवजी त्याची रक्कम पंचकमिटीकडे देण्याबाबत सूचना करीत आहोत. ते त्या रकमेतून देवीचे मंदिर अथवा परिसरात सुधारणा करतील. या उपर कोणी असे बेकायदेशीर कृत्य केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- संदीप शिंदे-पाटील
पोलीस पाटील, पोथरे