मार्गशीर्ष महिन्यात झेंडू शंभरीपार; अवकाळी पावसामुळे झेंडू आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 05:44 PM2021-12-17T17:44:25+5:302021-12-17T17:44:32+5:30
अवकाळी पावसामुळे फुलांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सोलापूर : मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी मागील आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतांमधील विविध पिकांसह फुलांच्या आणि फळांच्या लागवडीचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे फुलांची आवक कमी आहे. परिणामी, फुलांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. सध्या झेंडू शंभरीपार गेला आहे.
मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यांचा महिना आहे. त्यामुळे मंदिरात तसेच घरोघरी पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी करण्यात येत असतात. यामुळे या कालावधीत फुलांना आणि फळांना मोठी मागणी असल्याने त्यांची आवकही बाजारात मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र, सध्या आवक कमी आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, सांगोला, बार्शी, पंढरपूर आणि आसपासच्या फुलशेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, या ठिकाणावरून होणारी फुलांची आवक ५० टक्के कमी झाली आहे. इंधनाचे वाढलेले दर आणि मजुरांच्या मजुरीत झालेली वाढ यामुळे फुलांच्या दरात दुपटीने वाढ झाली असल्याचे फुलविक्रेत्यांकडून सांगण्यात आले. दीपावलीमध्ये ४० रुपये किलो दराने विकली जाणारी झेंडूची फुले सध्या १०० ते १२० रुपये किलो दराने विकली जात आहेत. ३० रुपये किलो दराने विकली जाणारी निशिगंधाची फुले सध्या ८० रुपये किलो दराने विकली जात आहेत.
फुलशेतीचे नुकसान
अवकाळी पावसामुळे फुलांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फुलांवर बुरशीजन्य रोगामुळे ती खराब झालेली आहे. तसेच कीड आणि अळ्या पडल्याने फुले काळी पडली. सततच्या पावसामुळे झेंडूच्या फुलांचे उत्पादन घटले आहे. परिणामी, ७५ टक्के फुलांचे नुकसान झाल्याने बाजारपेठांमधील आवक घटली.
असे आहेत दर
- झेंडू ८०-१००
- शेवंती १००-१२०
- निशिगंधा ६०-८०
- चिनीगुलाब ३५०-३८०
- गुलाब ८०-१००
मार्गशीर्ष महिन्यात मंदिरात तसेच घरोघरी पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी करण्यात येतात, यामुळे फुलांची मागणी जास्त असते. मात्र, मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे फुलांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. परिणामी, आवक कमी मागणी जास्त आणि वाढलेला माल, वाहतुकीचा खर्च या गोष्टींमुळे फुलांच्या दरात वाढ झाली आहे.
–श्रीशैल घुली, फुलविकेते
---