सिद्धेश्वर तलावातील पाण्यात उडी मारून विवाहीतेची आत्महत्या
By संताजी शिंदे | Published: April 4, 2024 06:36 PM2024-04-04T18:36:23+5:302024-04-04T18:36:42+5:30
माहिती मिळताच अग्नीशामक दलाचे जवान घटनास्थळी आले. पाण्यात उतरून महिलेचा शोध घेतला. महिलेला रस्सी बांधून पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
सोलापूर : श्री सिद्धेेश्वर मंदिर तलावातील पाण्यात उडी मारून विवाहीत महिलेने आत्महत्या केली. हा दुर्देवी प्रकार गुरूवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.
इरम्मा लिंगराज मेळी (वय २६ रा. बनशंकरी नगर, शेळगी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. इरम्मा मेळी ही पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जाते म्हणून घरातून बाहेर पडली. ती चालत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात आली, तेथे ती वॉकिंग करीत होती. वॉकिंग करता करता तीने संरक्षक कठड्यावरून थेट सिद्धेश्वर तलावाच्या पाण्यात उडी मारली. ती पाण्यात बुडू लागली तेव्हां आजू बाजूच्या लोकांनी आरडा ओरड केला. महिलेला कडेला येण्यासाठी आवाज दिला. मात्र ती गाळात असल्याने कडेला येऊ शकली नाही. ती पाण्यात बुडाली, तेव्हां स्थानिकांनी अग्नीशामक दलाला पाचारण केले.
माहिती मिळताच अग्नीशामक दलाचे जवान घटनास्थळी आले. पाण्यात उतरून महिलेचा शोध घेतला. महिलेला रस्सी बांधून पाण्यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान तिला शोधत आलेला दिर गर्दी पाहून जवळ आला. तेव्हा त्याला आपली वहिणीच असल्याचे लक्षात आले. महिलेला तात्काळ उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.