नारळी पौर्णिमादिनी सोलापुरातील मार्कंडेय मंदिर बंदच; धार्मिक विधीला मोजकेच पदाधिकारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 12:56 PM2021-08-07T12:56:35+5:302021-08-07T12:56:41+5:30
दर्शनासाठी भक्तांना मंदिरात येण्याची परवानगी नसणार
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही नारळी पौर्णिमा दिनी रविवार २० ऑगस्टला मार्कंडेय मंदिर बंद राहील. दर्शनासाठी भक्तांना मंदिरात येण्याची परवानगी नसेल. फक्त काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्कंडेय उत्सवमूर्तीची महापूजा व इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
नारळी पौर्णिमा दिनी मार्कंडेय मंदिर बंद ठेवण्याच्या सूचना फौजदार चावडी पोलिसांनी केली आहे. यासंदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत पद्मशाली ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पद्मशाली समाज बांधवांसाठी नारळी पौर्णिमा उत्सव खूप महत्त्वाचा असतो. कोरोनामुळे हा उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करता आला नाही. या दिवशी मार्कंडेय मंदिरातून भगवान मार्कंडेय महामुनी यांची रथयात्रा निघते. रथोत्सवात हजारो बांधव सहभागी होतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे मागच्या वर्षी रथोत्सवाला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे समाज बांधवांनी घरी बसून नारळी पौर्णिमा साध्या पद्धतीने साजरा केला. तर ज्ञाती संस्थेकडून ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. यंदाही कोरोनाची भीती कायम आहे. तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. त्यामुळे यंदाही प्रशासनाकडून श्रावणमासात कोणत्याही सार्वजनिक धार्मिक विधीला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदाही मार्कंडेय मंदिरात धार्मिक विधी सार्वजनिकरीत्या होणार नाहीत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होतील. नारळी पौर्णिमा दिनी मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. यासंदर्भात पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बैठकीनंतर ज्ञाती संस्थेकडून अधिकृतपणे याची घोषणा होईल.
श्रावण मासात मंदिरांमध्ये सार्वजनिकरीत्या धार्मिक विधींना परवानगी नाकारली आहे. मंदिरातील पारंपरिक धार्मिक कार्यक्रम होतील. पुजारी व्यतिरिक्त इतर कोणालाही धार्मिक विधी दरम्यान उपस्थित राहता येणार नाही. प्रशासकीय नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या मंदिर संस्थावर आम्ही कारवाई करू. सर्व मंदिर पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेतली. तशा सूचना सर्वांना दिल्या आहेत.
- राजेंद्र बहिरट
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,फौजदार चावडी पोलीस ठाणे