कडक निर्बंधांसह बाजारपेठा चालू ठेवण्यास परवानगी द्यावी : शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:14+5:302021-04-09T04:23:14+5:30
सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. व्यवसायासाठी बँकांकडून घेतलेले कर्ज, बँक कर्जाचे हप्ते, गाळा भाडे ...
सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. व्यवसायासाठी बँकांकडून घेतलेले कर्ज, बँक कर्जाचे हप्ते, गाळा भाडे व इतर कौटुंबिक समस्या यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण आलेला आहे. परिणामी, त्यांचे व्यवसाय डबघाईला आले आहेत. पुढील काही काळ कोरोना या विषाणूशी सामना करत घालवावा लागणार आहे. या लॉकडाऊनसंदर्भात जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदारांसाठी कडक निर्बंध ठेवून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून दुकाने चालू ठेवण्यास परवानगी दिल्यास व्यापाऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे.
शेती पिकांचे नुकसान होऊ नये, याची खबरदारी घ्यावी
गेले वर्षभर शेतकऱ्यांची कोरोनामुळे आर्थिक कोंडी होत आहे. लॉकडाऊन झाले की, फळ उत्पादन करणारे, पालेभाज्या, भुसार माल पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देऊन त्यांना योग्य भाव मिळवून देण्याची खबरदारी प्रशासनाकडून घेणे गरजेचे आहे. याचबरोबर शेती अवजारे, ट्रॅक्टर, मालवाहतूक व शेतीमालाची वाहतूक करणारी वाहने, दुचाकी वाहने यांची दुरुस्ती व सेवा देणारी केंद्रे सुरू ठेवायला परवानगी देण्याची मागणीही आ. बबनराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.