दुप्पट वयाच्या तरुणाशी अल्पवयीन मुलीचं लग्न; आईसह सहाजणांविरुद्ध बालविवाहाचा गुन्हा
By विलास जळकोटकर | Published: September 19, 2023 05:32 PM2023-09-19T17:32:14+5:302023-09-19T17:33:32+5:30
पोलिसांनी तातडीने पाऊले उचलून बालविवाह कायदा, विनयभंग आणि बाललैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला. नवऱ्या मुलाला अटक केली आहे.
सोलापूर : १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे तिच्या आईनं मुलीपेक्षा दुप्पट वयाच्या नात्यातील तरुणाशी लग्न लावून दिलं आणि माहेरी ठेवलं. नवऱ्या मुलानं पिडितेचे लजास्पद वर्तन केल्यानं त्याच्याविरुद्ध विनयभंग, बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा नोंदला तर अन्य सहाजणांविरुद्ध बालविवाह कायद्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. शहरातील एका भागात ही घटना घडलेली घटना सोमवारी रात्री उघडकीस आली.
यातील फिर्यादी ही शहरातील एका भागात राहण्यास आहे. तिचे दीर शहरात फिरस्ती असून, त्याची पत्नी (फिर्यादीची जाऊ) ही तिच्या १५ वर्षाच्या मुलीसोबत सांगली येथे राहण्यास आहे. फिर्यादीच्या जाऊने सासरी कोणालाही खबर न देता नात्यातील एका तरुणाशी तिच्या अल्पवयीन मुलीशी ८ जून २०२३ रोजी लग्न लावून दिले आणि सांगलीला निघून गेले. या काळात लग्न झालेल्या तरुणानं अल्पवयीन मुलीशी लजास्पद वर्तन केले. पिडित मुलीला लग्नानंतर स्वत:कडे ठेवून १८ वर्षानंतर तिला माहेर पाठवणार आहे अशी माहिती पिडित मुलीने तिच्या फिर्यादी चुलतीला दिली. त्यानुसार चुलतीने जाऊसह लग्नात उपस्थित असलेले नातलग, नवरा मुलगा अशा ६ जणांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने पाऊले उचलून बालविवाह कायदा, विनयभंग आणि बाललैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला. नवऱ्या मुलाला अटक केली आहे.