पंधरा वर्षांच्या मुलीसोबत बत्तीस वर्षीय मामाचा विवाह; नवरदेवासह वऱ्हाडींची ठाण्यात वरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 03:17 PM2021-02-15T15:17:33+5:302021-02-15T15:17:38+5:30
भावाने घेतली पोलिसांची मदत : व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त साधण्यासाठी केली घाई
संताजी शिंदे
सोलापूर : पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखून नवरदेवासह पाच जणांची वरात पोलीस ठाण्यात आणली. अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी येथे हा प्रकार घडला.
१६ तारखेच्या मुहूर्ताची वाट न बघता व्हॅलेंटाइन डे दिवशी सुरु झाली होती लग्नाची गडबड. अल्पवयीन मुलगी ही सोलापूर शहरातील एका शाळेमध्ये इयत्ता १० वीमध्ये शिकत आहे. मुलीच्या आई-वडिलांनी तिचा विवाह बत्तीस वर्षांच्या सख्ख्या मामासोबत करण्याचा निर्णय घेतला. दि. ६ फेब्रुवारी रोजी तिचा साखरपुडा केला होता. तो झाल्यानंतर मुलीला नवरदेवाच्या घरी नेण्यात आले. तिचा विवाह दि.१६ फेब्रुवारी रोजी होणार होता. आपली बहीण लहान आहे शिवाय तिला हे लग्न मान्य नाही, असे जेव्हा मोठ्या भावाच्या लक्षात आले तेव्हाच तो मित्रांकडे गेला. त्यांच्या मदतीने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यापर्यंत बहिणीचा बालविवाह होत असल्याची माहिती पोहोचवली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तत्काळ अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सांगून या बालविवाहाची माहिती दिली.
रविवारी सकाळी १२ च्या सुमारास काही पोलीस नवरदेवाच्या घरी गेले. पहिल्यांदा फक्त चौकशी केली नंतर लग्न करू नका असे तोंडी सांगून निघून गेले. मात्र नवरदेवाच्या घरचे व मुलीचे आई-वडील लग्नात अडथळा होऊ नये म्हणून तत्काळ दि.१४ फेब्रुवारी रोजी कसेबसे उरकून मोकळं होण्याची तयारी केली. या प्रकाराने भाऊ पुन्हा तणावात आला त्याने पुन्हा मित्रांना सांगितले. हा सर्व प्रकार पुन्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना समजला. त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. तेव्हा मात्र पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुंढेवाडी गाठली. चौकशी केली तेव्हा लग्न होणारी मुलगी अवघ्या १५ वर्षांची असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले. तिच्यासोबत तिचे आई-वडील, होणारा नवरा, आई व भाऊ यांना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
साहेब माझं जबरदस्तीनं लग्न लावत आहेत
अक्कलकोट पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी जेव्हा मुंढेवाडीत नवरदेवाच्या घरी गेले तेव्हा अल्पवयीन मुलगी समोर आली. तिने साहेब माझं जबरदस्तीने लग्न लावले जात आहे असं म्हणाली. तेव्हा पोलिसांना खात्री झाली अन् नवरदेवासह पाच जणांना ताब्यात घेतले. सर्वांना पोलीस ठाण्यात नेले.
भावाची धडपड; बालविवाह रोखला
साखरपुडा झाला तेव्हा बहीण रडत होती, मात्र आई-वडिलांच्या दबावाला घाबरून गप्प बसली होती. मुलगी मुंढेवाडीत गेल्यानंतर भावाला फोन करून रडत दादा माझं ऐकणार कोणी नाही. तू तर मला वाचव. माझं लग्न जर झालं तर मी जीव देईन तुला कधीही दिसणार नाही असं म्हणाली. तेव्हा भावाने मित्राच्या मदतीने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली आणि अखेर मुलीचा बालविवाह रोखला गेला.