coronavirus; विवाह होता कार्यालयात, पण झाला शेतमळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:05 PM2020-03-19T12:05:43+5:302020-03-19T12:08:24+5:30
कोरोनाचा परिणाम; लग्नातील गर्दी टाळण्यासाठी दोन्ही कुटुंबियांनी घेतला निर्णय
मोडनिंब : विवाहाची तारीख अन् मुहूर्त ठरलेला... मंगल कार्यालयही अॅडव्हान्स देऊन बुकिंग केलेले... इतकेच नाही तर लग्नपत्रिका देऊन निमंत्रणही दिले, फोटोग्राफरसह अन्य आवश्यक त्या व्यावसायिकांना आॅर्डर देऊन अॅडव्हान्सही दिला होता. पण जिल्हाधिकाºयांचा आदेश दाखवत मंगल कार्यालय मालकाने अचानक कार्यालय कॅन्सल करून अॅडव्हान्स घेतलेली रक्कम वधूपित्यास परत केली. त्यानंतर ऐनवेळी लग्न कुठे करायचे, असा प्रश्न पडलेला असताना मंगल कार्यालयाऐवजी शेतमळ्यात अगदी साध्या पद्धतीने १८ मार्च रोजी ठरलेल्या मुहूर्तावर पार पडला.
सविस्तर वृत्त असे की, मोडनिंब येथील दिगंबर जालिंदर शिंदे यांची मुलगी सायली हिचा सांगुळ (ता़ फुलंब्रा, जि़ औरंगावात) येथील रूपचंद मारुती जाधव यांचे चिरंजीव रविराज यांच्याशी १८ मार्च दुपारी १़३४ वाजण्याच्या मुहूर्तावर मोडनिंब येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात विवाह आयोजित केला होता, मात्र राज्यशासन, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार या कार्यालयाचे मालक प्रकाश गायकवाड यांनी तत्काळ वधू-वर यांच्या नातेवाईकांना बोलावून हे कार्यालय लग्नासाठी देण्यात येणार नसल्याचे सांगितले़ त्यामुळे आता लग्न करायचे कुठे, हा प्रश्न शिंदे व जाधव कुटुंबीयांना पडला.
अखेर वधू-वरांचे मामा व त्यांचे आईवडील यांच्या उपस्थितीत त्यांच्या मोडनिंब येथील शेतगळ्यात लग्न लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अतिशय साधेपणाने सायली व रविराज यांचा विवाह लावला़ सायली शिंदे व रविराज जाधव हे दोघेही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत़ धुमधडाक्यात लग्न करण्याचे नियोजन केले असतानाही त्यांनी अगदी साध्या पद्धतीने लग्न केल्याने केवळ कोरोना व्हायरसने दोन्ही कुटुंबांचे लाखो रुपये लग्नासाठी होणारा खर्च वाचला, अशी चर्चा रंगू लागली़
माझे पती रविराज यांनी व आम्हा दोघांकडील सर्व नातेवाईकांनी शासनाच्या या निर्णयाचा आदर केला़ सर्व पाहुण्यांना लग्नासाठी येऊ नका, असे निरोप पाठविले़ कार्यालयात होणारे लग्न रद्द करून तेथे होणारी गर्दी टाळण्यासाठी आम्ही आमच्या शेतमळ्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला़
- सायली शिंदे-जाधव, नववधू