वीर जवान तुझे सलाम; शहीद धनाजी होनमाने यांचे पार्थिव पुळूजमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 01:17 PM2020-05-18T13:17:19+5:302020-05-18T13:18:02+5:30
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; पालकमंत्र्यासह जिल्हा व पोलीस प्रशासनातील अधिकारी दाखल
सोलापूर : गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पुळूज (ता़ पंढरपूर) येथील शेतकरी कुटुंबातील जवान धनाजी होनमाने यांना वीरमरण आले आहे़ त्यांचे पार्थिव गडचिरोलीमधून सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पुळूजमध्ये दाखल झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
शीघ्र कृती पथक (क्यूआरटी) आणि विशेष अभियान पथकाचे जवान रविवारी सकाळी ६ वाजेपासून संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. ६.३० च्या सुमारास दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. पण नक्षलवाद्यांच्या गोळीने क्युआरटी पथकाचे उपनिरीक्षक होनमाने हे शहीद झाले. शहीद झाल्याची वार्ता पुळूज येथे समजताच पुळूज गावावर शोककळा पसरली.
सोमवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहीद होनमाने यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री भरणे म्हणाले की, शहीद होनमाने यांच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल, त्यांच्या भावाला शासकीय नोकरी तर आई-वडिलांना पेन्शन मिळवून देण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते.