अरणगावच्या घराघरात काचकामाचे कारागीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:33 PM2019-05-03T12:33:58+5:302019-05-03T12:35:42+5:30
शेकडो तरुणांना मिळू लागला रोजगार; दररोज पाचशे ते हजार रुपयांपर्यंत मजुरी
शहाजी फुरडे-पाटील
बार्शी : बार्शीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले अरणगाव हे दीड हजार लोकवस्तीचे गाव. शेती, मोलमजुरी, वीटभट्टीला माती पुरविणे हा गावाचा पारंपरिक व्यवसाय; मात्र गावातील भाऊसाहेब बब्रुवान खराडे यांच्या अॅल्युमिनियम सेक्शनच्या व्यवसायाने गावातील तरुणांचे जीवनच बदलले. त्यांनी सुरू केलेल्या या व्यवसायामुळे आज गावातील प्रत्येक घरातील युवक या व्यवसायात स्थिरावला असून दररोज ५00 ते एक हजार रुपये रोजगार या तरुणांना मिळू लागला आहे. गावात शक्यतो असे घरच नाही त्यांचा मुलगा या व्यवसायात नाही.
बार्शीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अरणगावातील जमीनही मुरमाड आहे. शेती व दुग्ध व्यवसाय हा गावाचा पारंपरिक व्यवसाय असून, गेल्या १५-२0 वर्षांपूर्वी आपल्या शेतातील वरील भागाची माती वीटभट्टी व्यावसायिकांना विकण्याचे व त्यावरच मोलमजुरी करून घर चालवायचे हेच या गावाचे वैशिष्ट्य होते; मात्र गावातील भाऊसाहेब बब्रुवान खराडे यांनी पुण्यामध्ये अॅल्युमिनियम सेक्शनच्या व्यवसायात काही दिवस काम केले व नंतर औरंगाबादमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरु केला. त्यांनी त्या व्यवसायामध्ये गावातील काही मुले कामासाठी नेली. अनुभव मिळाल्यानंतर त्यातील काहीजणांनी गावाकडे व्यवसाय सुरु केला. आज बार्शी शहरात अरणगावातील आण्णा काजळे, गणेश काजळे, लालासाहेब विधाते, सचिन झोडगे, कृष्णा झोडगे, दादा झोडगे, मारुती शिंदे, शांतीलाल कदम या आठ जणांचा स्लाईडिंग विंडो व काच कामाचा व्यवसाय आहे. एकाचे बघून एक गावातील युवक या व्यवसायात कारागीर म्हणून स्थिरावले आहेत.
कोणाच्याही घरी बांधकाम सुरु असताना तुम्ही गेलात आणि चौकशी केली तर सदरचा कारागीर हा मी अरणगावचा असल्याचे अभिमानाने सांगतो. काच काम व स्लाईडिंग विंडोबरोबरच लाईटची कामे करणारे अनंता खराडे, दामोदर मांडवे, हणमंत चापले, संतोष मिस्कीन तर प्लंबिंगचे काम करणारे सुयोग चापले, गोकुळ चापले व धीरज झोडगे तर दिनेश काजळे व सचिन झोडगे हे पीओपीचे काम करतात. गावामध्ये नोकरीमध्ये असणाºयांचे प्रमाण अत्यल्प असून शेती, काच काम व दुग्ध व्यवसाय हा गावाचा उत्पन्नाचा प्रमुख आधार बनला आहे.
सर्वच क्षेत्रातील कारागीर
गावामध्ये स्लाईडिंग विंडोचे काम करणारे ५0, लाईट फिटिंग करणारे १५ ते २0 व प्लंबिंग, गवंडी काम करणारे २५ कारागीर गावात आहेत. एकंदरीत घराचे पूर्ण काम करण्यासाठी लागणाºया सर्व क्षेत्रातील कारागीर या गावात असल्याचे लखन क्षीरसागर यांनी सांगितले. या कारागिरांना १५ ते ३० रुपये फुटावर मजुरी मिळते. एक कारागीर साधारणपणे ५० ते १०० फूट दररोज काम करतो. या कामातून त्यांना दिवसाला ५०० ते १००० रुपये रोजगार मिळतो. त्यामुळे या गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे.