काँग्रेसच्या तार्इंना सेना-भाजपचं जोरदार आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 04:02 PM2019-07-02T16:02:56+5:302019-07-02T16:05:03+5:30
वेध विधानसभेचे; शहर मध्य विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीत वाढतेय इच्छुकांची गर्दी
राकेश कदम
सोलापूर: शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात शिवसेना आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांना अटक झाल्याने वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
शहर मध्यमधून आमदार प्रणिती शिंदे सलग दोनवेळा निवडून आल्या आहेत. पहिल्या वेळेस त्यांनी माकपचे नेते नरसय्या आडम यांचा पराभव केला होता. मागील निवडणुकीत एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी त्यांना आव्हान दिले होते. अटीतटीच्या लढतीत प्रणिती शिंदे यांनी विजय मिळविला.
शिंदे यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. आक्रमक भाषणशैली, थेट मतदारांशी संपर्क यामुळे प्रणिती यांना आव्हान देण्यासाठी विरोधकांना परिश्रम घ्यावे लागतात. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला मताधिक्य मिळाले. काँग्रेसच्या दिग्गज नगरसेवकांच्या प्रभागात काँग्रेस मागे राहिली. ही आकडेवारी पाहून आमदार प्रणिती शिंदे यांनी नकारात्मक प्रभागांमध्ये स्वतंत्र दौरे सुरू केले आहेत. कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्याचा अहवाल तार्इंच्या कार्यालयाला कळवित आहेत. महापालिकेतील वादातून नगरसेवकांमध्ये धुसफूस आहे. त्यातून काँग्रेसची यंत्रणा विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.
मागील निवडणुकीत एमआयएम हा काँग्रेसचा मुख्य शत्रू होता. यंदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना हाच काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी असेल. भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास प्रणिती शिंदे यांना निकाराची झुंज द्यावी लागेल.
वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख प्रमुख दावेदार मानले जात होते, परंतु विजयपूर येथील काँग्रेसची कार्यकर्ता रेश्मा पडकेनूर यांच्या खून प्रकरणात तौफिक शेख यांना अटक झाली. या मतदारसंघात एमआयएमची व्होट बँक आहे. यामुळे वंचित आघाडीची उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रत्येक बुथला शिवसेनेचे नियोजन
- शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यंदा पुन्हा मैदानात असतील. या मतदारसंघात कोठे आणि परिवाराची एक व्होट बँक आहे. शिवाय प्रत्येक बुथनिहाय एक शाखा सुरू करण्याचे नियोजन शिवसेनेने सुरू केले आहे. भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास कोठेंचा मार्ग सुकर होईल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. पण युती तुटल्यानंतर कोठे भाजपमध्ये गेलेच तर ऐनवेळी नवा उमेदवार कुठून आणायचा याची धाकधूक शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाºयांमध्ये आहे. त्यातच शिवसेनेचे उपजिल्हा संपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा अस्मिता गायकवाड यांनीही तयारी सुरू केली आहे.
घरकुलांमुळे मास्तरांचा विश्वास दुणावला
- लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता. विधानसभेला मात्र माकप स्वतंत्र लढण्याची तयारी करीत आहे. रे नगर येथील ३० हजार घरकूल प्रकल्पाचे काम मंजूर झाल्यामुळे माजी आमदार नरसय्या आडम यांचा विश्वास दुणावला आहे. काँग्रेसचे तगडे समाजकारण आणि तगडे अर्थकारण, भाजप, शिवसेना आणि एमआयएमचे धार्मिक राजकारण या गोंधळात माकपचा आवाज कुठपर्यंत पोहोचेल याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात शंका दिसते.