उजनीकाठी मस्त बहरला पक्ष्यांचा मेळा, कुणी ना येई इथे शांतता मनसोक्त खेळा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 03:41 PM2020-05-01T15:41:44+5:302020-05-01T15:43:48+5:30
लॉकडाऊनमध्येही गूड न्यूज: पाणी अन् ध्वनिप्रदूषण थांबले; परदेशी पाहुण्यांचा मुक्त संचार
अक्षय आखाडे
कोर्टी: कोरोना व्हायरसच्या धक्क्यानं सर्वत्र हाहाकार उडालाय... सरकारनं लॉकडाऊन जाहीर केलाय... पशुपक्ष्यांना कुठलं लॉकडाऊन... हक्काचं आश्रयस्थान असलेले उजनी बॅकवॉटर जलाशयाच्या काठावर हजारो किलोमीटर अंतर पार करुन आलेल्या परदेशी पाहुण्यांचा मुक्त संचार सुरू आहे. हे विहंगम दृश्य पाहण्याची संधी मात्र कोरोना व्हायरसनं मनुष्यापासून हिरावून घेतली आहे.
कोरोना व्हायरसच्या निमित्तानं हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषण थांबल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांचे आश्रयस्थान असणारा उजनी जलाशय परिसर गजबजला आहे. उजनी धरण परिसर हे देशी-परदेशी पक्ष्यांचे नंदनवन समजले जाते. या ठिकाणी थंडीच्या हंगामात अनेक परदेशी पक्षी येत असतात. देशी व स्थानिक पक्ष्यांची संख्या मोठी असते. यावर्षी झालेला भरपूर पाऊस आणि उजनीमध्ये पक्ष्यांसाठी पूरक असे वातावरण आहे.
गेल्या तीन आठवड्याहून अधिक काळ सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नदीपात्रात माणसांची वर्दळ अजिबात नाही. मासळी बाजार बंद असल्याने मासेमारीही बंद आहे. शिवाय पक्षी पर्यटनसुद्धा बंद आहे. माणसांचा संपर्क नदीपात्रात अत्यंत कमी असल्यामुळेच पक्ष्यांना मनसोक्त मोकळीक मिळाली असल्याचे पक्षी अभ्यासकांचे मत आहे. बाहेरून येणाºया पक्ष्यांचीही अद्याप मोठ्या संख्येने रेलचेल आहे.
आभाळाच्या छताखाली भरली मुक्त शाळा
- फ्लेमिंगो, चक्रवाक बदक, नदीसुरय, कुरकीरा, उघड्या चोच्याचा करकोचा (आसाम) आदी पक्षी मोठ्या संख्येने आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी फ्लेमिंगो हा देखणा पक्षी हजारोच्या थव्याने मुक्त संचार करताना दिसतोय. करड्या, पांढºया अशा विविध रंगाचे बगळे, करड्या रंगाचा करकोचा, वकील, वंचक, शराटी किंवा कुदळ्या, उघड्या चोच्याचा करकोचा, तुतवार, कंठेरी चिखल्या, जांभळी पाणकोंबडी, पांढºया मानेचा करकोचा, शराटी, पाणकावळा, थापट्या, हळदीकुंकू बदक, कुरव आदी प्रकारचे स्थानिक पक्षी उजनी जलाशयात मुक्तपणे बागडत आहेत. जणू या साºया पक्ष्यांची मुक्तशाळा नदीकाठी भरत आहे.
प्रजननासाठी पोषक काळ.. संख्या वाढणार
- मुबलक मिळणारे अन्न, निर्भय वातावरण यामुळे उन्हाळ्यात प्रजनन व वीण करणाºया पक्ष्यांसाठी हा कालावधी अत्यंत पोषक व सुरक्षित बनला आहे. चंबळच्या खोºयातून येणारा नदीसुरय आणि कुरकीराया पक्षांनी आता अंडी उबवून त्यातून छोटी पिल्ले बाहेर आली आहेत. आसामहून येणाºया उघड्या चोचीचा करकोचा मोठ्या संख्येने दिसतोय. अनेक पक्ष्यांच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. त्यामुळे पुढील काळात, यातील अनेक पक्षी प्रजातींची संख्या वाढण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांतून व्यक्त होत आहे.
मासेमारी बंद असल्याने पक्ष्यांसाठी मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे. कोणत्याही भीती व वर्दळीशिवाय पक्ष्यांची मुक्तशाळा नदीकाठी भरत आहे. भरपूर मिळणारे जलीय अन्न, निर्भय वातावरण यामुळे उन्हाळ्यात प्रजनन करणाºया पक्ष्यांसाठी हा उत्तम काळ निर्माण झाला आहे. यामुळे पक्ष्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
- कल्याणराव साळुंके, पक्षीमित्र कुंभेज