अट्रॉसिटी, पोक्सो, खंडणीतील आरोपींच्या अटकेसाठी मातंग समाजाचा बार्शी तहसील कार्यालयावर मोर्चा
By काशिनाथ वाघमारे | Published: August 11, 2023 06:40 PM2023-08-11T18:40:22+5:302023-08-11T18:40:33+5:30
एका आर.टी.आय. कार्यकर्त्याने महिला व मुलींचे चित्रीकरण करुन फोटो काढले.
सोलापूर : एका आर.टी.आय. कार्यकर्त्याने महिला व मुलींचे चित्रीकरण करुन फोटो काढले. ते प्रसारित न करण्यासाठी खंडणीची मागितल्याप्रकरणी दोघांवर बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. यातील आरोपिंना तत्काळ अटक करा या मागणीसाठी शुक्रवारी सकल मातंग समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा निघाला.
लहुजी चौक येथून माेर्चा निघाला. तेथून तो तेल गिरणी चौक, शिवाजी आखाडा, एस. टी. स्टॅण्ड चौक, अण्णाभाऊ साठे चौक, सोमवार पेठ, पांडे चौक मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, अमोल चव्हाण, किरण तौर, रोहित खलसे, पप्पू हनुमंते, सुनील अवघडे, संदीप आलाट, योगेश लोंढे, रवी थोरात, नाथा मोहिते, विकी खलसे, बाबा शेंडगे, अक्षय साळूंके, सत्यजित खलसे सहभागी झाले. मोर्चात महिलाही सहभागी झाल्या होत्या.
यावेळी तहसीलदार एफ. एम. शेख यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात दलित महासंघ, मातंग एकता आंदोलन, ऑल इंडिया पॅथर्स संघटना, बहुजन मुक्ती मोर्चा, लहुजी शक्ती सेना सहभागी झाल्या.