चालवायला दिलेल्या पेट्रोलपंपावरील हिशेब व नफा न देताच साहित्य परस्पर विकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:24 AM2021-09-21T04:24:18+5:302021-09-21T04:24:18+5:30
पोलीस सूत्रांनुसार स्वप्निल मुत्तूर (रा. रविदीप अपार्टमेंट, दक्षिण सदर बझार, सोलापूर) यांनी सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ ...
पोलीस सूत्रांनुसार स्वप्निल मुत्तूर (रा. रविदीप अपार्टमेंट, दक्षिण सदर बझार, सोलापूर) यांनी सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर टोलनाक्याजवळील प्रियांका पेट्रोलियम सर्व्हिसेस या नावाचा पेट्रोलपंप धनश्री दत्तात्रय शिंदे (रा. तुळजापूर रोड, सोलापूर) यांच्याकडून ५ मे २०१८ रोजी कराराने चालवण्यासाठी घेतला होता. हा पेट्रोलपंप २५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत मुत्तूर यांनी चालवला. परंतु त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे पेट्रोलपंपाकडे त्यांना लक्ष देणे शक्य होत नसल्याने त्यांनी त्यांचे नातेवाईक मनीष अजय काळजे (रा. सोलापूर) यास हा पेट्रोलपंप २५ ऑक्टोंबर २०१९ रोजी करार तत्त्वावर चालवण्यासाठी दिला.
काही कालावधीनंतर मुत्तूर यांनी मनीष काळजे याच्याकडे पेट्रोलपंपावरील हिशोब मागितला, त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली व वेळ मारून नेली. तसेच पेट्रोलपंपाच्या बनावट चाव्यांचा सेट करून स्वतःकडे ठेवला. ३ नोव्हेंबर २०१९ रोजी पंपावर मुत्तूर यांनी ८ लाख १६ हजार रुपयांच्या डिझेल टँकरचा लोड मनीष काळजे याला भरून दिला. त्यानंतर पेट्रोलपंपावरील मिळालेल्या उत्पन्नापैकी आठ लाख १६ हजार रुपये काळजे याने मुत्तूर यांना देण्याऐवजी स्वतः खर्च करून टाकले. याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर काळजे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मुत्तूर यांनी काळजे यास वारंवार फोन करून पंपावरील उत्पन्नाबद्दल विचारपूस करत पैसे मागितले. काळजे याने आठ लाख ४६ हजार रुपये जानेवारी २०२१ पर्यंतचे उत्पन्न देतो असे सांगितले.
दरम्यान, जानेवारी २०२० मध्ये स्वप्निल मुत्तूर पेट्रोलपंपावर साहित्य पाहण्यासाठी गेले. पंपावरील इर्न्व्हर - बॅटऱ्या व कॉम्प्युटर असा एकूण ७३ हजार रुपयांचे साहित्य परस्पर विकून टाकल्याचे दिसून आले. याप्रकरणी स्वप्निल मुत्तूर यांनी मनीष काळजे याच्याविरोधात एकूण नऊ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल नोंदला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे करीत आहेत.
--