‘मातृवंदनेत’ सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल, ६ हजार ६७३ गर्भवती मातांची नोंदणी पूर्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 09:14 AM2018-01-06T09:14:47+5:302018-01-06T09:16:45+5:30
केंद्र सरकारने गभर्वती महिला आणि बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत सोलापूरजिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल ठरला आहे. आरोग्य विभागाने अवघ्या पंधरवड्यात ६ हजार ६७३ गरोदर मातांची नोंदणी पूर्ण केली आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : केंद्र सरकारने गभर्वती महिला आणि बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत सोलापूरजिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अव्वल ठरला आहे. आरोग्य विभागाने अवघ्या पंधरवड्यात ६ हजार ६७३ गरोदर मातांची नोंदणी पूर्ण केली आहे. यातील काही मातांच्या बँक खात्यावर १ लाख ७० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. या कामात आशा वर्कर आणि वैद्यकीय अधिकाºयांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ मधील तरतुदीच्या आधारे १ जानेवारी २०१७ पासून मातृवंदना योजना सुरू केली. या योजनेतून गर्भवती महिलेच्या पहिल्या अपत्यावेळी तीन टप्प्यात ५ हजार रुपये देण्यात येतात. यासाठी लाभार्थ्यांची यादी संकेतस्थळावर अपलोड करावी लागते. सुरुवातीला निवडक जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनेचे काम डिसेंबर २०१७ पासून सोलापुरातही सुरू झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी प्रथम सर्व वैद्यकीय अधिकाºयांची बैठक घेऊन या कामाला गती दिली. जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. अधिकाºयांनी हे काम मिशन मोडवर घेतले.
आशा वर्करच्या माध्यमातून जमवलेली माहिती वैद्यकीय अधिकाºयांनी संकेतस्थळावर अपलोड केली. माहिती अपलोड करण्याच्या कामी पुणे, सातारा जिल्ह्यांनंतर सोलापूरच्या आरोग्य विभागाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील २५ हजार मातांपर्यंत ही योजना पोहोचविण्याचे उद्दिष्ट डॉ. भारुड यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
------------------
कागदपत्रांसाठी शिबीरही घेतले
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव म्हणाले की, या योजनेमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतात. सुरुवातीला काही गर्भवती महिलांचे आधार कार्ड, ओळखपत्राअभावी बँक खाते नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे यासाठी स्वतंत्र शिबीर घेण्यात आले. या शिबिरामुळे बँक खाती उघडणे सोपे गेले.
---------------------
१ लाख ७० हजार रुपये खात्यावर जमा
- डिसेंबरमध्ये ६ हजार ६७३ गर्भवती मातांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. या मातांच्या बँक खात्यावर अनुदान जमा व्हावे, यासाठी तीन टप्प्यातील १४ हजार ६१६ अर्ज भरून घेण्यात आले आहेत. यातील काही मातांच्या खात्यावर १ लाख ७० हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित मातांच्या खात्यावर निकषानुसार अनुदानाची रक्कम जमा होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी सांगितले.