माऊलींचा ४ जुलै तर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ५ जुलैला सोलापूर जिल्ह्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 10:47 AM2022-05-09T10:47:21+5:302022-05-09T10:47:27+5:30
पालखी मार्ग,पालखी तळ सोहळ्यास सज्ज ठेवण्यासाठी तत्काळ कार्यवाही करा; जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना
सोलापूर : गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने आषाढी वारी वारकरी संप्रदायाच्या प्रथा-परंपराचे जतन करून मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात आली होती. यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता असून, पायी पालखी सोहळ्याबरोबर दिवसें-दिवस वारकरी व भाविक संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी व भाविकांना पालखी मार्गावर व पालखी तळावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.
जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे आगमन 4 जुलै तर जगदगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन 5 जुलै 2022 रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पालखी मार्ग व विविध पालखी तळांची पाहणी जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी केली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक हिंम्मत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, आप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, बसवराज शिवपुरे, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, जगदिश निंबाळकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक केशव घोडके, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, विश्वस्त योगेश देसाई, मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावर,तसेच बाबासाहेब चोपदार यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, पालखीतळ, पालखी मार्ग तसेच विसाव्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, अखंडीत वीज पुरवठा तसेच पालखी तळांवर प्रखर प्रकाश व्यवस्था तसेच स्वच्छतेबाबत नियोजन करुन तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. पालखी कट्टयाची डागडुजी करुन घ्यावी, पालखी मार्गावरील व तळांवरी अतिक्रमणे तत्काळ काढावीत. पालखी तळावर पाणी साठून चिखल होऊ नये यासाठी तात्काळ मुरमीकरण करुन घ्यावे.
पालखी महामार्गाची कामे सुरू असल्याने वाटेत अडथळा येणार नाही, याची दक्षता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेऊन आवश्यक ती कामे तातडीने करून घ्यावीत. पालखी महामार्गासाठी ज्या ठिकाणचे पालखी कट्टे व विसाव्याचे कट्टे काढण्यात आले आहेत त्या ठिकाणी पर्यायी जागेची उपलब्धता करुन तत्काळ कट्टे बांधून घ्यावेत.
पालखी आगमनाच्या ठिकाणी सोयीस्कर जागेची व्यवस्था करून त्या ठिकाणी मंडप, लाऊड स्पीकर व मान्यवरांना बसण्यासाठी जागेची व्यवस्था करावी. पुरंदावडे येथील गोल रिंगण सोहळ्यासाठी शेती महामंडळाची जागा उपलब्ध करून घेण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच खुडूस येथे उभे रिंगणासाठी जागा अपुरी पडणार असल्याने रिंगणा शेजारील खाजगी मालकीची जागा उपलब्ध करुन घ्यावी. यामध्ये पालखी सोहळ्याचे विश्वस्त मंडळी, स्थानिक नागरिक यांच्या सूचनांचा देखील विचार करावा. जेणेकरून पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना कुठलेही सेवा सुविधांपासून वंचित राहता येऊ नये. यासाठी प्रत्येक विभागाने नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यावेळी दिल्या