अरणगावच्या महिलेने साधली किमया; तीन एकरात घेतले २१ टन सेंद्रिय पेरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 10:49 AM2020-02-07T10:49:10+5:302020-02-07T10:53:50+5:30
खारघर बाजारात अरणगावचे फळ; वनमाला गायकवाड शेतकरी महिलेची यशोगाथा
बालाजी विधाते
कारी : गावचा शिवार तसा मुरमाडच... कुसळ उगवायला देखील मुश्कील... अशा जमिनीत फळबागेची लागवड केली. तीन एकरावर पेरूची लागवड केली़ या लागवडीपूर्वी मशागत आणि त्याच्याबरोबर रासायनिक खत पूर्णत: टाळून गोमूत्र, काळा गूळ, शेण आणि बेसन पिठाच्या मिश्रणातून जीवामृत वापरले़ अभ्यासू वृत्तीने केलेल्या लागवडीतून दहा महिन्यांत २१ टन सेंद्रिय पेरूचे फळ घेतले आहे़ आज ही फळं मुंबईतील खारघर परिसरातील बाजारात सर्वाधिक दराने विकली जात आहेत.
बार्शी तालुक्यातील अरणगाव येथील शेतकरी वनमाला गायकवाड या महिलेने ही किमया साधली आहे़ दोन मुलं अभियंते आहेत़ परंतु त्यांचा शिक्षणाकडे ओढा असल्याने त्या स्वत: शेतीकडे लक्ष देतात. अरणगाव शिवारातील बहुतांश भागातील माती ही वीटभट्टीला विकली गेल्याने या भागाची मुरमाड म्हणून ओळख निर्माण झाली आहे़ वनमाला यांना वडिलोपार्जित २० एकर जमीन आहे. शेतामध्ये पेरूच्या एक हजार रोपांची लागवड केली. या जमिनीमध्ये त्यांनी पेरू हे मुख्य फळ आणि याच्याबरोबरीने आंबा व जांभूळ, बांबू अशी इतर पिके त्या घेताहेत.
त्यांनी संपूर्ण शेती ही सेंद्रिय पद्धतीने केली आहे. ८ बाय ८ अंतराने पेरूची रोपं लावली आहेत. फळाच्या वाढीसाठी कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला नसून, कीटकनाशक म्हणून गोमूत्र फवारले आहे. खताचा पूरक डोस म्हणून जीवामृतचा वापर केला आहे. हे तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने अंबविण्याची प्रक्रियाद्वारे वापरली आहे़ देशी गाईचे शेण, गोमूत्र, काळा गूळ आणि बेसन पीठ यांच्या मिश्रणातून हे तयार केले़ ही रोपं जगवण्यासाठी दीड एकर क्षेत्रात २़५ कोटी लिटरचे शेततळे उभारले आहे़ त्यात मत्स्यपालनही केले आहे. ठिबक सिंचनाचा आणि जीवामृतचा वापर केला आहे. याशिवाय आठवड्यातून दोन वेळा फवारण्या केल्या़ फळवाडीपोटी एकरी १५ हजार रुपये खर्च आला आहे.
कृषीभूषण पुरस्काराने गौरव
- वनमाला गायकवाड यांच्या या प्रयोगशील शेतीची दखल घेऊन बार्शी कृषी पदवीधर संघटनेने घेऊन सन २०१९ चा ‘भगवंत कृषीभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कृषी सहायक बाळासाहेब चापले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून ही शेती विकसित करायला मदत केली आहे़
भविष्यात शेती फायदेशीर ठरणार आहे. परंतु शेतकºयाने प्रत्येक कामाचा हिशोब ठेवला पाहिजे. कमी खर्चाची पिके व फळबागेची लागवड करून आपली शेती जास्त फायद्यात कशी राहील, याचा विचार करणे गरजेचे आहे़ अभ्यासू वृत्तीने शेती केल्यास उत्पन्न वाढते, अपेक्षित निकाल हाती येतो.
- वनमाला गायकवाड, पेरू उत्पादक महिला शेतकरी