पुणे अन् बळ्ळारी येथून सोलापुरात पोलीस बंदोबस्तात २७ मे टन ऑक्सिजन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:35 PM2021-04-27T12:35:21+5:302021-04-27T12:35:26+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : पुणे अन् बळ्ळारी येथून प्राणवायूचे आगमन
सोलापूर : पुणे येथून १५ मे. टन तसेच बल्लारी येथून १२ मे. टन असे एकूण सत्तावीस मे. टन ऑक्सिजन सोमवारी सोलापुरात दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
विशेष म्हणजे पुणे येथून ऑक्सिजन सोलापुरात आणताना ऑक्सिजनची पळवापळवी होऊ नये, याकरिता जिल्हा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विशेष दक्षता घेतली आहे. त्यांनी ऑक्सिजन टँकर मागे पोलिसांचा बंदोबस्त लावला. तसेच माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनाही टँकरच्या मागावर तैनात केले. जगदीश निंबाळकर हे सोमवारी पुण्यात ठाण मांडून ऑक्सिजनचा टँकर सोलापुरात आणला. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना सोमवारी सोलापुरात तब्बल २७ टन ऑक्सिजन दाखल झाले आहे.
शंभरकर यांनी सांगितले, परजिल्ह्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी पूर्वी एक टँकर उपलब्ध होता. तो दहा टनांचा होता. आता दुसरे एक टँकर राज्य शासनाकडून अधिग्रहण करून मिळाले आहे. दोन्ही टँकर प्रत्येकी दहा टन क्षमतेचे आहेत. त्यामुळे आता २० टन क्षमता असलेले दोन टँकर जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. तसेच मोठ्या हॉस्पिटलकडून देखील ऑक्सिजन मागवले जात आहेत. त्यामुळे या दोन्ही टँकरमधून रोज पुणे आणि बल्लारी येथून मुबलक ऑक्सिजन आणता येईल. तसे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून झाले आहे. पुढील दोन-तीन दिवसांत ऑक्सिजनचा तुटवडा पूर्णपणे कमी होऊन जाईल. त्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत. कोणत्या रुग्णाला किती ऑक्सिजन दिला. त्याचे ऑडिट करण्याच्याही सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत.
ऑक्सिजनचा पुरवठा असा
- अश्विनी हॉस्पिटल- ७ मे. टन
- मार्कंडेय रुग्णालय- ५ मे. टन
- सिव्हिल हॉस्पिटल- ५ मे. टन
- गंगामाई हॉस्पिटल- ३ मे. टन
- इतर हॉस्पिटल- ७ मे. टन