नववर्ष सुखा-समाधानाचे जाऊ दे! भाविकांच्या गर्दीने राज्यातील लहान-माेठी तीर्थक्षेत्रे गजबजली; दर्शनासाठी लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 02:14 PM2024-01-01T14:14:57+5:302024-01-01T14:15:34+5:30
पंढरपूर, अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
सोलापूर : वर्षअखेरीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर, अक्कलकोटमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दोन्ही ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंढरपुरात मागील आठवड्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच रविवारची सुटी, वर्षअखेर, नवीन वर्षाचे स्वागत व श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची संख्या वाढत आहे. यामुळे विठ्ठल मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
आठ दिवसांत पंधरा लाख जणांनी घेतले शनिदर्शन
नेवासा (जि. अहमदनगर) : नाताळ सणाची सुटी, नवीन वर्षानिमित्त श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथे गेल्या आठ दिवसांत पंधरा लाख भाविकांनी शनिदर्शन घेतले. नवीन वर्षाच्या सुरुवातीला गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता शनैश्वर देवस्थानने वर्तविली आहे.
नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला रविवारी दिवसभरात तीन लाखांहून अधिक भाविकांनी शनिदर्शन घेतले. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत भाविकांचा ओघ सुरूच होता.
साईनगरीत साईनामाचा जल्लोष; भक्तिरसाची उधळण
शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत साईंच्या साक्षीने व त्यांच्याच भूमीतून करण्यासाठी देश-विदेशातील भाविकांनी साईनगरीत गर्दी केली. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साईनामाच्या गजराने व फटाक्यांच्या आतषबाजीने साईनगरीचा आसमंत उजळून निघाला.
नववर्षाचे स्वागत शिर्डीतून करण्यासाठी अनेक भाविक आवर्जून साईनगरीत येत असतात. ३१ डिसेंबरच्या रात्री मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. दुपारनंतर भक्तांचा ओघ वाढला.
अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात भक्तांचा ओघ
कोल्हापूर : सरत्या वर्षाला निरोप देताना कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यातच थर्टी फर्स्टमुळे पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांमुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
शहरात गर्दीमुळे परिसरातील लॉज, हॉटेल फुल्ल झाली. विशेष म्हणजे, रविवारी शहरातील प्रसिद्ध मिसळ खाण्यासाठीही नागरिकांनी रांगा लागल्या होत्या. गर्दीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.