मायेची कसरत; आई सीईटी परीक्षेत मग्न...पिता झोळीतल्या बाळासोबत दंग
By Appasaheb.patil | Published: October 8, 2021 11:43 AM2021-10-08T11:43:25+5:302021-10-08T11:44:09+5:30
शिक्षणाची निस्सीम आस; सासू, पती, दीर अन् आईचीही मोठी मदत
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : शिक्षणाची निस्सीम आस... पोटी तान्हुलं बाळ असूनही मोठी शिक्षिका बनून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द... ती पूर्ण करण्यासाठी त्या सहा महिन्यांच्या बाळासह मातेने चक्क आई, सासू, पती, दीर असा गोतावळा परीक्षा केंद्राच्या बाहेर एका झाडाखाली जमविला. इकडे बाळाला झोळीत घालून गोतावळा खेळवत, भूक भागवत होता अन् तिकडे ती माता प्रश्नपत्रिकेतील एक एक प्रश्नाचे उत्तर मन लावून सोडवीत परीक्षा देत होती. तिचे एक मन प्रश्नपत्रिकेतील प्रश्नावर तर दुसरे मन बाहेर झोळीत झोपलेल्या बाळाकडे... हे चित्र पाहायला मिळाले केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात.
शिवानी धनाजी वायभासे असे त्या मातेचे नाव. केम (ता. करमाळा) येथील रहिवासी... शिवानी या मूळच्या बार्शी तालुक्यातील. लग्नानंतर त्या केमच्या सूनबाई झाल्या. लहानपासूनच शिक्षिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या शिवानी यांना सासू लक्ष्मीबाई वायभासे, आई वर्षा रानमळ, पती धनाजी वायभासे व इतर नातेवाइकांची मोठी साथ मिळाली. अभ्यास, क्लासेस, परीक्षेच्या तयारीसाठी घरच्यांनी प्रोत्साहन दिले. या प्रोत्साहनामुळेच शिवानी या विवाहित महिलेने बार्शीत पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून डी.एड.चे शिक्षण घेण्यासाठी अभ्यासाची तयारी केली. सकाळ अन् संध्याकाळी घरची कामे करून रात्री उशिरापर्यंत अन् पहाटेच्या सुमारास अभ्यास करून सीईटी परीक्षेचा सिलॅबस पूर्ण केला. शिवाय सहा महिन्यांच्या बाळाचे संगोपनही त्या करीत होत्या.
---------
दोन तास बाळ झोळीतच...
आई शिवानी या परीक्षेला गेल्याने सहा महिन्यांचा शिवांश धनाजी वायभासे याच्यासाठी सिंहगड कॉलेजच्या परीक्षा केंद्र परिसरात असलेल्या झाडाला झोपण्यासाठी झोळी बांधण्यात आली होती. अर्ध्या अर्ध्या तासाला शिवांश जागी व्हायचा. त्याला कडेवर घेऊन शिवानी यांच्या सासूबाई व आई इकडे-तिकडे फिरायच्या, त्याला खेळवायच्या. सोबत दूूध, दुधाची बाटलीही आणली होती. जास्त वेळ रडायला लागले की, बाटलीतील दूध पाजून त्याला आई अन् सासूबाई शांत करायच्या. याकामात पती धनाजी यांचीही मदत मोलाची ठरली.
----------
असा होता परीक्षेच्या दिवसाचा प्रवास...
सीईटी परीक्षा सोलापुरात होणार होती. त्यामुळे सकाळी पाच वाजता वायभासे कुटुंब उठून सोलापूरला येण्याची तयारी करीत होते. सकाळी साडेसातच्या सुमारास केममधून ते सोलापूरकडे मार्गस्थ झाले. साडेबारा वाजता सीईटीचा पेपर होता. मात्र, रिपोर्टिंगची वेळ ११ ची हाेती, त्यामुळे वायभासे कुटुंबीय सकाळी साडेदहाच्या सुमारासच सिंहगड परिसरातच पोहोचले होते.
--------
एक चांगली शिक्षिका होण्याचे माझे स्वप्न आहे. या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मला आमच्या सासूबाई, सासरे, पती, दीर व आईही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत असतात. या प्रोत्साहनामुळेच मी बी.एड.साठीची सीईटी परीक्षा आनंदात देऊ शकले. एक आदर्श शिक्षिका होण्याचे माझे स्वप्न लवकरच पूर्ण करेन.
- शिवानी धनाजी वायभासे,
केम, ता. करमाळा.