नगराध्यक्षांनी वॉर्डात निवडून येऊन दाखवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:11+5:302021-07-10T04:16:11+5:30
बागल गटाचे विरोधी पक्षनेते श्रीनिवास कांबळे, नगरसेविका राजश्री माने, संगीता कांबळे या काही नगरसेवकांनी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या कामाचे ...
बागल गटाचे विरोधी पक्षनेते श्रीनिवास कांबळे, नगरसेविका राजश्री माने, संगीता कांबळे या काही नगरसेवकांनी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या कामाचे कौतुक केले. त्यामुळे शहरात राजकीय चर्चा रंगल्या आहेत. यावर बागल गटाचे नगरसेवक तांबोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तांबोळी म्हणाले, ‘शहरातील रस्ते, उद्यान, पार्क, वृक्ष लागवड, शौचालय, निधी वाटप हे किती झाले, कसे झाले, कधी झाले, हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. निवडणूक जवळ आली असताना, स्वतःचे कौतुक करून घेऊन, मी किती चांगला हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या बघायला मिळत आहे. नवीन व्यापारी संकुलाला तडे गेल्याचे प्रकरण नगरसेवक सचिन घोलप यांनी उचलताच स्वतःचे कौतुक करून घेण्याचा राजकीय स्टंट नागरिकांना समजत नाही असे समजू नये,’ असेही ते म्हणाले.
तांबोळी म्हणाले, ‘आदिनाथवर टीका करताना जगतापांनी हे लक्षात ठेवावे की, आदिनाथ वर २००६ पर्यंत सत्ता असताना, तुमचे रखडलेले कामगारांचे दोन वर्षांचे पैसे सत्ता आल्यावर बागल गटाने दिले. त्यावेळी तर सहकार क्षेत्रावर आजच्या एवढ्या अडचणी नव्हत्या. बागल गट काही स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी बनवलेला गट नाही. स्व.दिगंबरमामा बागल यांच्याविषयीच्या नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या मनातील प्रेमाने तयार झाला आहे. बागल गटाचा कार्यकर्ता स्व.मामांपासून आहे व गट हा कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभा आहे. त्यामुळे अशा काही लोकांच्या जाण्याने बागल गटाला कोणताही फरक पडत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे सोडून गेले ते का गेले, हे सर्वश्रूत आहे. जनतेला सर्व माहिती आहे, असेही अल्ताफ तांबोळी म्हणाले.