स्मार्ट सिटीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सोलापूरच्या महापौरच उतरल्या रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 04:20 PM2021-08-04T16:20:06+5:302021-08-04T16:20:25+5:30
निदर्शने केली : भाजपचे दोन खासदार पंतप्रधानांकडे करणार तक्रार
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून शहरात नियोजन शून्य कामे सुरू आहेत. वारंवार सांगूनही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत नसल्याचा आरोप करीत महापालिकेतील सत्ताधारी महापौरांसह भाजप नगरसेवकांनी मंगळवारी स्मार्ट सिटीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे दोन खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.
स्मार्ट सिटीच्या कामातील दिरंगाईबद्दल व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेता शिवानंद पाटील, नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी मंगळवारी स्मार्ट सिटीच्या कार्यालयावर धडक मारली. या नगरसेवकांच्या उपस्थितीत महापौरांनी स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. ढेंगळे-पाटील यांनीही कामातील दिरंगाई, ठेकेदारारील कारवाईबाबत स्पष्टीकरण दिले. लक्ष्मी मार्केट, रस्त्याच्या निकृष्ट दर्जावरूनही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, नागेश भोगडे, श्रीनिवास करली, विनायक विटकर, नारायण बनसोडे, अविनाश पाटील, अमर पुदाले, राजेश अनगिरे, वैभव हत्तूरे, नगरसेविका वंदना गायकवाड, महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, निर्मला तांबे, राजश्री कणके, सोनाली मुटकरी, संगीता जाधव, सुरेखा काकडे, देवी झाडबुके, बिज्जू प्रधाने, श्रीनिवास पुरुड, अजित गायकवाड, गिरीश बततुल, सतीश महाले, आदी उपस्थित होते.
सोलापुरात सचिन वाझेंना पाठवले!
ढेंगळे-पाटील मनपाच्या आढावा बैठकीला येत नाहीत. स्मार्ट सिटीच्या भोंगळ व अपुऱ्या कामांमुळे ३ ते चार निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. समांतर पाइप लाइनचे पंपगृह असो वा इतर कामांबद्दल व्यवस्थित माहिती दिली जात नाही. स्मार्ट सिटीच्या कामात गेल्या एक वर्षापासून भ्रष्टाचार होत आहे. निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत. मनमानी कामे सुरू आहेत. स्मार्ट सिटीचे सर्वस्व मी आहे, अशा पद्धतीने ढेंगळे-पाटील वागत आहेत. यांच्या रूपात महाविकास आघाडीने सोलापुरात सचिन वाझे पाठविला आहे, असा आरोप डॉ. किरण देशमुख यांनी केला आहे.